मंत्र्यांप्रमाणेच आता सचिवदेखील फिरणार
By admin | Published: November 7, 2015 03:01 AM2015-11-07T03:01:09+5:302015-11-07T03:01:09+5:30
राज्यकारभार चांगला चालविण्यासाठी प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाराजी व्यक्त केल्यामुळे आता प्रशासनात हालचाल सुरू झाली आहे
मुंबई : राज्यकारभार चांगला चालविण्यासाठी प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाराजी व्यक्त केल्यामुळे आता प्रशासनात हालचाल सुरू झाली आहे. सर्व विभागांचे सचिव आठवड्यातून दोन दिवस दौऱ्यावर राहतील, असा आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज काढला.
एरवी मंत्री दौरे करतात आणि सचिव मुख्यत्वे मंत्रालयात बसून असतात. मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांची जबाबदारी काही सचिवांकडे सोपविली होती. पालक सचिव ही जुनी संकल्पना प्रशासनात आहेच, पण पालकमंत्री फिरतात त्याच्या १० ते २० टक्केही पालक सचिव संबंधित जिल्ह्याचा दौरा करत नाहीत, असा अनुभव आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर की काय पण मुख्य सचिवांनी काढलेल्या आदेशात, विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव या सर्वांनाच मंत्रालयाच्या वातानुकूलित कक्षातून बाहेर काढून राज्यभर दौऱ्यांवर पाठविण्याची भूमिका घेतली आहे. सर्व सचिवांनी ग्रामीण भागांत मुक्काम करून सामान्यांशी संवाद साधावा व त्यांचे प्रश्न सोडवावेत, असे मुख्य सचिवांनी आदेशात म्हटले आहे.
राज्य शासनामार्फत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. त्यांची गावपातळीपर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणे गरजेचे आहे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा घेणे, सामान्यांचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हे दौरे आवश्यक असल्याचे फर्मान मुख्य सचिवांनी काढले आहे. (विशेष प्रतिनिधी)
क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावे लागणार
पूर्वी वरिष्ठ अधिकारी क्षेत्रीय कार्यालयांना भेट देऊन सखोल तपासणी करत. तीच पद्धत अवलंबण्यात येईल. भेटीदरम्यान समोर आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी ते मार्गदर्शन करतील. मुख्य सचिव सचिवांनी केलेल्या कामाची नोंद मूल्यमापन अहवालात करतील.
मुख्य सचिवही दौरा करणार
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय स्वत:देखील राज्याचा दौरा करणार आहेत. लोकोपयोगी योजनांचा आढावा ते या भेटीत घेणार आहेत.