आता खासदारांचा कस
By admin | Published: May 17, 2014 11:59 PM2014-05-17T23:59:57+5:302014-05-17T23:59:57+5:30
झोपडीधारकांचे पुनर्वसन, असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांसमोर असून, त्यांचा आता कस लागणार आहे.
Next
>मुंबई : मोनोचा दुसरा टप्पा अपूर्ण, धारावीचा रखडेला पुनर्विकास, ईस्टर्न फ्री वे, सेस प्राप्त इमारतींचा प्रश्न, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, चेंबूर-माहूल परिसरातील प्रदूषण झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास आणि झोपडीधारकांचे पुनर्वसन, असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांसमोर असून, त्यांचा आता कस लागणार आहे.
वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा येथे पिण्याचे पाणी, सांडपाणी, सेसप्राप्त इमारतींचा रखडलेला पुनर्विकास या प्रमुख समस्या आहेत. माहीम, धारावी, वडाळा, सायन, चेंबूर आणि अणुशक्तीनगर येथील झोपडय़ांमधील प्रश्न गंभीर आहेत. सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा रखडलेला पुनर्विकास आणि जुन्या वसाहतींचा पुर्नविकास, असे अनेक प्रश्न येथे आहेत.
दक्षिण मुंबईत सुमारे शंभर वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या सेस प्राप्त इमारतींचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षापासून सुटलेला नाही. चेंबूर, माहूल परिसरातील खासगी कंपन्यांमधून बाहेर पडणा:या प्रदूषित पाणी आणि वायूमुळे येथे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मालाड आणि मालवणी येथे कारखाने असून, येथील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. पश्चिम उपनगरांतील मोकळ्या भूखंडावर भूमाफियांचा डोळा आहे. परिणामी ते संरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अंधेरी, विलेपार्ले, कलिना आणि कुर्ला येथील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. रस्ता रुंदीकरणातंर्गत येथील प्रकल्प सुरू झालेले नाहीत. मालाड आणि मालवणी येथील पायाभूत सेवासुविधांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. 5क् लाखांवर वस्ती असलेल्या पश्चिम उपनगरांत पुरेशी खासगी आणि सरकारी रुग्णालये नाहीत.
चारकोप, मालाड आणि मालवणी येथील तिवरांचे कत्तलीचे प्रमाण वाढते आहे. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षक भिंतीचा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. परिणामी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून रेंगाळला आहे. गोरेगाव, बोरीवली आणि कांदिवली येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील रेल्वे स्थानकांवरील लोकलची संख्या वाढविण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मेट्रो रेल्वे मार्ग पूर्ण झालेला नाही. शिवाय मेट्रो प्रकल्पांतर्गत जे रहिवासी बाधित झाले आहेत त्यांना अद्याप दिलासा देण्यात आलेला नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या झोपडय़ांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासून चिघळला आहे. वांद्रे पूर्वेकडील गरीब नगर आणि भारत नगर येथील झोपडय़ा वाढतच आहेत.