बालवाडीत आता नवा अभ्यासक्रम
By admin | Published: March 4, 2016 12:21 AM2016-03-04T00:21:06+5:302016-03-04T00:21:06+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या बालवाड्या सक्षम करण्यासाठी आणि तेथील शिक्षण पद्धतीत नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश, आनंददायी शिक्षण देण्याच्या उद्देशाने सभापती
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या बालवाड्या सक्षम करण्यासाठी आणि तेथील शिक्षण पद्धतीत नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश, आनंददायी शिक्षण देण्याच्या उद्देशाने सभापती चेतन घुले व उपसभापती नाना शिवले यांनी बालवाडीचे समन्वयक व बालवाडीताईंची बैठक घेतली. बालवाडीताईंशी संवाद साधला. आगामी शैक्षणिक वर्षापासून बालवाड्यांना अभ्यासक्रम देण्याचे सभापती घुले यांनी जाहीर केले.
महापालिकेच्या चिंचवड स्टेशन येथील शाळेत ही बैठक झाली. या वेळी सदस्य धनंजय भालेकर, विजय लोखंडे, लता ओव्हाळ, सविता खुळे, शिरीष जाधव, निवृत्ती शिंदे, श्याम आगरवाल, विष्णू नेवाळे, चेतन भुजबळ, फजल शेख, प्रशासन अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे, संजीवनी मुळे, कुसुम बोदडे, अरुणा शिंदे, सुरेखा मारणे, अलका शिंदे, नलिनी साळी उपस्थित होत्या.
बैठकीत बालवाड्या सक्षम करण्या संदर्भात बालवाडीताईंशी संवाद साधला. सूचनाही घेतल्या. अभ्यासक्रमामध्ये एकसलगता व एकसूत्रीपणा आणण्यासाठी जून २०१७ पासून बालवाड्यांना अभ्यासक्रम देण्याचा निर्णय सभापती घुले यांनी घेतला. (प्रतिनिधी)
कारेकर म्हणाले, ‘‘तीन ते सहा वर्षांचा हा काळ बालविकास व बालशिक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा काळ असतो. शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, भाषिक, कलाविषयक अशा सर्वच विकासाचा पाया या कालावधीत घातला जातो. प्रत्येक गोष्ट करून बघण्याची उत्सुकता, अनुकरणातून शिकण्याचा प्रयत्न देखील या काळाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. विकासाच्या या टप्प्यावर मूल समूहात मिसळण्यास उत्सुक असले, तरी ते स्वकेंद्रितही असते. या सगळ्या बाबी ध्यानात घेऊन सर्वच बालवाड्यांमध्ये बालवर्गाची रचना, क्रियाकलापांची योजना, शिक्षकाची भूमिका व कार्यपद्धती आखण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.’’