आता अधिकाऱ्यांचे ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 08:41 PM2021-02-12T20:41:42+5:302021-02-12T20:53:01+5:30
कोरोनोत्तर काळात कार्यसंस्कृती उन्नत करण्याचे आवाहन
मुंबई : कोरोनोत्तर काळात स्वत:ला सावरण्याबरोबरच राज्याचे प्रशासकीय कामकाज सुरळीत आणि गतिमान होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय नोकरी ही वेतन घेऊन समाजाची सेवा करण्याची संधी आहे, असे मानून कार्यसंस्कृती उन्नत करावी आणि आपल्या राज्याची विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन महासंघाने केले आहे.
महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे यांनी पत्रकाद्वारे अधिकारी, कर्मचारी यांना आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी कोरोना रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. यासाठी राज्य शासनामार्फत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात आले. त्याचप्रमाणे आता प्रशासकीय कामकाजाला गती देताना राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान राबवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याअंतर्गत कार्यालयीन कामकाजातील अनावश्यक बाबींना कात्री लावून तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या कार्यालयातील कार्यपद्धती अधिक सुलभ आणि पारदर्शक कराव्यात. नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची आवश्यकता पडणार नाही किंवा ते अशक्य असल्यास त्यांना कार्यालयात कमीतकमी वेळा यावे लागेल, अशी सुधारणा करावी. नागरिकांशी संबंध येणाऱ्या कामाची नेमकी कार्यपद्धती तसेच आवश्यक कागदपत्रे काय आहेत याबाबतची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालयात दर्शनी भागात सहज उपलब्ध असावी. उद्योग व व्यापार यांना पोषक वातावरण तयार करावे, लाल फितीला फाटा देऊन नाविन्यपूर्ण कल्पनांना उत्तेजन द्यावे. शेतकरी, मजूर, अन्य गोरगरीब बांधव यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवावी. योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात, कुठल्याही कामाचे योग्य रितीने नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपले काम करताना अनेकदा बाह्य दबावाचा सामना करावा लागतो. असा सामना निर्धाराने व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एकीच्या बळावर करणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणे व नियमांच्या चौकटीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या मागे महासंघ सदैव उभा असेल. सहकारी तसेच कार्यालयात येणारे अभ्यागत या सर्वांशी सौजन्यपूर्ण वागणूक आवश्यक आहे. आपल्या संपूर्ण कार्यसंस्कृतीचा मुख्य आधार हा शंभर टक्के प्रामाणिकपणा असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.