आता आॅनलाइन पेपर तपासणी

By admin | Published: January 25, 2017 05:16 AM2017-01-25T05:16:42+5:302017-01-25T05:16:42+5:30

मुंबई विद्यापीठात परीक्षेनंतर पेपर तपासणीला वेळ लागला, गुण कमी दिले असे अनेक प्रकार घडत असतात. पेपर तपासनीसांच्या अनेक तक्रारी असतात.

Now online paper check | आता आॅनलाइन पेपर तपासणी

आता आॅनलाइन पेपर तपासणी

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठात परीक्षेनंतर पेपर तपासणीला वेळ लागला, गुण कमी दिले असे अनेक प्रकार घडत असतात. पेपर तपासनीसांच्या अनेक तक्रारी असतात. पण मार्च - एप्रिलमध्ये मुंबई विद्यापीठांतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या निकालामध्ये असे कोणतेही प्रकार होणार नाहीत. कारण, आता पेपर तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देखमुख यांनी जाहीर केले.
याआधी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पेपर आॅनलाइन पद्धतीने तपासले जात होते. आता ही प्रणाली विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी आणि तंत्रज्ञान शाखेतील सर्व पेपर तपासणीला लागू होणार आहे. या बदलामुळे यापुढे पेपर तपासनीसांना हातात पेन घेऊन पान उलटत बसावे लागणार नाही. पेपर तपासणीमध्ये पारदर्शकता यावी, तपासनीसांचा वेळ वाचावा यासाठी आॅनलाइन तपासणीची सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षी विविध शाखांतील ४०२ परीक्षांचे आयोजन करण्यात येत असून, १९ लाख ५० हजार उत्तरपत्रिका (३२ पानी एक ) छापण्यात येतात. आॅनलाइन तपासणीमुळे तपासनीसांचा त्रास कमी होईल. आणि पेपर तपासणीला कमी वेळ लागणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
परीक्षा झाल्यावर सर्व उत्तरपत्रिका या स्कॅन केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तपासनीसाला एक आयडी तयार करून देण्यात येईल. या आयडीवर लॉग इन करून तपासनीसाला पेपर तपासता येणार आहे. पेपर तपासून झाल्यावर कोणत्याही प्रकारे गुणांमध्ये बदल करता येणार नसल्यामुळे गुण कमी-जास्त झाले, मोजायचे राहून गेले या घटनांना आळा बसणार आहे.
आॅनलाइन पेपर तपासणी करणे तपासनीसांना सोपे जाणार आहे. सध्या सर्व प्राध्यापक, शिक्षक संगणक वापरतात. त्यामुळे त्यांना हे कठीण जाणार नाही. यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. पण, तशी गरज पडणार नाही. त्यांना प्रणाली समजावून सांगण्यात येईल. तपासनीसांची मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे मत डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले.
एप्रिलमध्ये नवे परीक्षा भवन
मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ कालिना कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेले ६ मजली नवे परीक्षा भवन एप्रिल महिन्यात कार्यान्वित होणार आहे. हे भवन अद्ययावत असून, संगणकांची सोय करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये फक्त परीक्षेचे कामकाज चालणार आहे. या इमारतीमध्ये एसी आहे. उत्तरपत्रिकासाठी असणारे रॅक येथे कमी दिसतील. (प्रतिनिधी)
आठ दिवसांत लागणार टीवायबीकॉमचा निकाल
१ टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राची परीक्षा संपून तीन महिने उलटल्यावरही निकाल जाहीर झाला नसल्यामुळे विद्यार्थी चिंतित आहेत. सहाव्या सत्राची परीक्षेची तारीख जवळ येत असूनही आधीच्या सत्राचा निकाल लागला नसल्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठावर टीका होत आहे. पण, पुढच्या आठ दिवसांत टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.
२ तीन वर्षांपूर्वीपर्यंत टीवाय सर्वच पदवी परीक्षा या एकदाच विद्यापीठामार्फत व्हायच्या. पण, गेल्या तीन वर्षांपासून या परीक्षा प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यानुसार, आता पदवी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतल्या जातात. टीवायबीकॉमसाठी सुमारे ६८ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. पाचव्या सत्राच्या परीक्षा पार पडल्यावर विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
३पेपर तपासणी एकाच ठिकाणी करण्यात येत होती. या परीक्षेच्या पेपर तपासणीसाठी वेगळी पद्धत अवलंबण्यात आली होती. महाविद्यालयांत पेपर तपासणी केंद्र सुरू करण्यात आली होती. तिथे पेपर तपासणीला पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा पेपर एकत्र करण्यात आले. यामुळे पेपर तपासणीला वेळ लागला. पण, पेपर तपासणी पूर्ण झाली असून, पुढच्या आठ दिवसांत निकाल जाहीर होईल, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

Web Title: Now online paper check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.