आता एकच महापूजा
By admin | Published: July 16, 2015 04:02 AM2015-07-16T04:02:40+5:302015-07-16T04:02:40+5:30
पंढरीत आषाढीला यंदा विठुरायाची नित्यपूजा आणि महापूजा या दोन्ही एकाच वेळी सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला संमती दिल्यामुळे वारकऱ्यांना
सोलापूर : पंढरीत आषाढीला यंदा विठुरायाची नित्यपूजा आणि महापूजा या दोन्ही एकाच वेळी सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला संमती दिल्यामुळे वारकऱ्यांना दर्शनासाठी तब्बल तीन तास जास्त मिळतील. दोन्ही पूजा आटोपून पहाटे २ वाजल्यापासून वारकऱ्यांना दर्शनासाठी मंदिर खुले केले जाणार असल्याने दर्शन रांगेतील वैष्णवांना ‘विठ्ठल पावला‘ असल्याची भावना वारकऱ्यांतून व्यक्त होत आहे़
प्रतिवर्षी रात्री १२ ते पाच या वेळेत विविध तीन पूजा करण्यासाठी मंदिर दर्शनासाठी बंद केले जाते़ यंदा एकाच वेळी महापूजा करण्यात येणार असल्याने साडेबारा ते दोन याच वेळेत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी दिली़ यासंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, त्यांनी प्रशासनाने सुचविलेल्या गोष्टी मान्य केल्या आहेत़ त्यांच्या निर्णयामुळे खूप मोठा वेळ वाचणार आहे़
दरवर्षी खासगीवाल्यांची एक, मंदिर समितीची नित्यपूजा आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा अशा तीन पूजा होतात़ न्यायालयाच्या निर्णयामुळे बडवे-उत्पातांचे अधिकार जसे संपुष्टात आले त्याचप्रमाणे खासगीवाल्यांचे हक्क संपुष्टात आले आहेत़ त्यामुळे यंदा खासगीवाल्यांची पूजा होणार नाही़
मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी तसेच जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते नित्यपूजा आणि महापूजा एकाच वेळी होणार आहेत़