आता आपले पंतप्रधान जगातील नेत्यांच्या पाठीवर हात ठेवतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 06:09 AM2022-08-05T06:09:26+5:302022-08-05T06:09:42+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी : नरेंद्र मोदी २०-२० तास काम करतात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या रूपाने अनेक वर्षांनंतर भारताला एक आत्मनिर्भर पंतप्रधान लाभले आहेत. ते २०-२० तास काम करतात. देश आता अधिक गतीने प्रगती करीत आहे. जगात भारतातील लोक आता गौरव करू लागले आहेत. पूर्वी जगातील नेते आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीवर हात ठेवायचे; परंतु आता चित्र बदलले आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील नेत्यांच्या पाठीवर हात ठेवतात, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
पहिल्यांदा देशासाठी वीस-वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा, परंपरांना लोक नावं ठेवायची. मात्र, आज मोदींमुळे देशाचा जगात गौरव वाढत आहे, असेही ते म्हणाले. गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानावरून राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती डॉ. अनिल काकोडकर होते.
१०० वर्षे एखादी संस्था विद्यादानाचे काम करते, हे अतिशय प्रेरणादायी आहे. या भूतकाळातून नव्या भविष्याचा आराखडा आम्हाला तयार करायचा आहे. या विद्यापीठातून देशाचा गौरव वाढवणारी नामवंत मंडळी तयार झाली आहेत. नितीन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांना घडविणारे हे ज्ञानपीठ असल्याचे राज्यपाल म्हणाले.
नागपूरचे गडकरी
हे रोडकरी
राज्यपालांनी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही गुणगान केले. ते म्हणाले, नितीन गडकरी हे नागपूर विद्यापीठाचेच विद्यार्थी. आज देशात गडकरी हे आपल्या कामामुळे रोडकरी म्हणून सन्मानाने ओळखले जातात. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेवरील आपल्या प्रेमाचा पुनरुच्चार केला.
तुकडोजी महाराजांना प्रत्यक्ष ऐकले होते
nमहाराष्ट्रातील विद्यापीठांची नावे संतांच्या नावाने असल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आपण प्रयागमध्ये प्रत्यक्ष ऐकले होते, असे सांगत राष्ट्रसंतांच्या ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ या गीताचा उल्लेख करून कर्तृत्ववान पिढी निर्माण करण्याचे कार्य विद्यापीठाने करावे.
nज्येष्ठ वैज्ञानिक होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या भाषणात विद्यापीठांनी केवळ विद्यार्थीच घडवू नये, तर देश घडविण्याचे दायित्व व भूमिका आपल्याकडे घ्यावी, असे आवाहन केले.