आता पंकजांना हवे आहे गृह खाते !
By admin | Published: April 16, 2017 09:09 PM2017-04-16T21:09:28+5:302017-04-16T21:09:28+5:30
पंकजा मुंडे यांनी एक पाऊल मागे घेत मला गृहमंत्री व्हायचे असल्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे.
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 16 - मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे विधान केल्यानंतर आता पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी एक पाऊल मागे घेत मला गृहमंत्री व्हायचे असल्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणे व पोलीस कर्मचारी निवासस्थानांचे उदघाटन त्यांच्या उपस्थितीत रविवारी झाले.
या प्रसंगी पंकजा मुंडे म्हणाल्या, गृह खाते हे माझे आवडते खाते असून, मला या खात्याची मंत्री म्हणून काम करण्याची इच्छा आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या हिमतीने गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी पोलिसांना सदैव प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यकाळात पोलिसांचे आत्मबळ उंचावले होते. त्यांनी केलेले काम मी अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे हे खाते मिळाल्यास आनंदच होईल, असेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी पंकजा यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगून मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांनी गृहमंत्री होण्यास आवडेल, असे सांगून गृहमंत्रिपदावर दावा सांगून गुगली टाकली आहे. गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सूत्रसंचालन उपअधीक्षक प्रियंका फड यांनी केले तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी केले. यावेळी पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.