आता पालकांसह वाहनमालकांवरही होणार कारवाई
By Admin | Published: September 18, 2016 05:29 AM2016-09-18T05:29:07+5:302016-09-18T05:29:07+5:30
वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना जीव गमवावा लागण्याच्या घटनेनंतरही पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे.
मुंबई : विनाहेल्मेट अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकल्यामुळे वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना जीव गमवावा लागण्याच्या घटनेनंतरही पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. याला आळा घालण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे. यात १८ वर्षांखालील मुले गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांसह मालकांनाही कोठडीची हवा खावी लागणार आहे. अशा प्रकरणांमध्ये एक हजार रुपये दंड किंवा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत.
विनापरवाना गाडी चालविणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. अल्पवयीन वाहनचालकांवर २०१५मध्ये ८ हजारांहून अधिक तर जुलै २०१६पर्यंत ६ हजारांहून अधिक कारवाईची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, ५० सीसी क्षमतेपेक्षा जास्त इंजिन असलेल्या वाहनांचा परवाना १८ वर्षांखालील मुलांना दिला जात नाही. तर सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक वाहन चालविण्यास २० वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
मात्र तरीदेखील या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे होत आहे. खार परिसरात विनाहेल्मेट अल्पवयीन आरोपीला पकडले म्हणून दुचाकीस्वारासह त्याच्या भावाने विलास शिंदेंवर हल्ला चढविला. या हल्ल्यात शिंदेंचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला. परिवहन विभागाने केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कारवाई सुरू करण्याचे आदेश राज्यभरातील प्रादेशिक विभागांना दिले आहेत. (प्रतिनिधी)
>परिपत्रक जारी
या आदेशामुळे अल्पवयीन चालकांच्या पालकांबरोबर वाहन मालकांनाही कोठडीची हवा खावी लागणार आहे.
हे आदेश लागू करण्याचे परिपत्रक १४ सप्टेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे पाठविले असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.