आता रात्रीस खेळ चाले...
By admin | Published: May 23, 2017 02:00 AM2017-05-23T02:00:04+5:302017-05-23T02:00:04+5:30
रणरणत्या उन्हात, सुटीच्या काळात राजकीय नेत्यांच्या दृष्टीने तापलेले आणि गेले दहा दिवस प्रचाराच्या धावपळीने चर्चेत असलेले भिवंडीतील राजकीय वातावरण सोमवारी संध्याकाळी शांत झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी/अनगाव : रणरणत्या उन्हात, सुटीच्या काळात राजकीय नेत्यांच्या दृष्टीने तापलेले आणि गेले दहा दिवस प्रचाराच्या धावपळीने चर्चेत असलेले भिवंडीतील राजकीय वातावरण सोमवारी संध्याकाळी शांत झाले. लगोलग पक्ष कार्यालयांत उमेदवारांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची गर्दी झाली. मतदान बुधवारी असले तरी सोमवार आणि मंगळवारची रात्र जागवण्यासाठी, चुहा मिटींगसाठी खलबते सुरू होती. मतदानावेळी ठिकठिकाणी दहशत माजवण्याचे, कुरापती काढून भांडणे उकरून काढण्याचे आणि दहशत माजवण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवणार असल्याची ग्वाही दिली.
प्रचाराचा शेवटचा दिवस कारणी लावण्यासाठी पद्मानगर, अशोकनगर, शांतीनगर, गैबीनगर, खंडूपाडा, दर्गा रोड आदी ठिकाणी उन्हातान्हात घामाघूम होत प्रचार केला. मतदारांना आवाहन केले. प्रचारफेऱ्या काढल्या, चौकसभा घेतल्या. प्रचाराची वेळ संपताच आचारसंहिता पाळण्यासाठी झेंडे, पोस्टर, बॅनर काढून टाकण्यात आले.
निवडणूक प्रचार संपेपर्यंत कुरापतींना सुरूवात झाली. काही टोळक्यांनी रविवारी रात्रीपासून कुरापती काढण्यास सुरूवात केली. मतदारांत दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यातूनच रात्री खासदार कपील पाटील यांची मानसरोवरमध्ये सभा सुरू असताना अचानकपणे जनरेटरची वायर कापून वीजप्रवाह खंडीत करण्याचा प्रयत्न झाला, तर पद्मानगरमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय काबूकर यांच्या गाडीची काच फोडून काही समाजकंटकांनी तिचे नुकसान केले.
भाजपा-कोणार्क आघाडी, शिवसेना, समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, एमआयएम, रिपब्लिकन पक्षांचे गट, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट आणि अपक्षांनीगेल्या दहा दिवसांत घरोघरी जाऊन प्रचार केला असला, तरी शेवटच्या चार दिवसांतच त्याला गती आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख सभा झाल्या. शिवसेनेतर्फे एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. त्यावर कार्यकर्तेच ही निवडणूक जिंकून देतील, असा विश्वास ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, वऱ्हाळदेवी आणि कल्याण रोड भागात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विनापरवानगी प्रचारफेरी काढल्याने त्यांच्याविरोधात शहर पोलीस
ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
हल्ल्याच्या भीतीने बंदोबस्तात प्रचार
शिवसेनेचा उमेदवार मल्लेशम राजेशम कोंडी याच्या कामतघर वऱ्हाळादेवी नगरातील प्रचारादरम्यान त्याला अंबादास गायकवाड, सचिन साठे आणि शिवा पडेकर यांनी शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याने त्याने पोलीस बंदोबस्तात प्रचार केला.
स्लिपा न वाटल्याचे उघड
मतदानाच्या दोन दिवस अगोदर मतदारांना त्यांचे केंद्र व बूथ समजावा यासाठी घरोघरी स्लिपा उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्यानंतरही बीएलओंनी त्या वाटल्या नसल्याचे सोमवारी उघड झाले.
त्यामुळे हलगर्जी केलेल्या बीएलओंचे निलंबन करण्याचा इशारा मुख्य निवडणूक अधिकारी योगेश म्हसे यांनी दिला. मुख्याध्यापक व शिक्षकांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे. हे काम मंगळवारी त्यांना पूर्ण करावे लागणार आहे.
मतदारांवर दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने बाहेरून येणाऱ्या गुंडावर लक्ष ठेवण्यासाठी मतदानाच्या दिवशी नाकाबंदी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संवेदनशील केंद्रे, बुथ येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रसंगी सुरक्षिततेसाठी ड्रोनची मदत घेतली जाईल. २६ तारखेला निकाल लागल्यानंतर उमेदवारांना मिरवणूक काढण्यास पोलिसांनी बंदी घातल्याची माहिती त्यांनी दिली.मतमोजणी होईपर्यंत तीन पोलीस उपायुक्त, पाच सहाय्यक पोलीस आयुक्त, ५३ पोलीस निरीक्षक, १६० सह किंवा उप निरीक्षक, २१२० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड, एसआरपीएफच्या तीन कंपन्या, क्युआरटी, वज्र वाहन व आरएएफ यांचा बंदोबस्त असेल. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ४३ आरोपींवर मोक्का लावण्यात आला. छोट्या-मोठ्या गुन्ह्यातील १८१७ लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. धोकादायक वाहने चालविणारे २५, ड्रन्क अॅण्ड डा्रईव्हचे आठ गुन्हे नोंदवण्यात आले.
सहा अवैध शस्त्रे, चाकू-तलवारीसारखी नऊ शस्त्रे जप्त करण्यात आली. परवानाधारकांपैकी ६३ जणांची शस्त्रे पोलिसांनी जमा केली. १३५ जणांवर कारवाई करून ११ लाख ५९ हजार २९८ रूपयांची दारू जप्त झाली आणि ९३ लाख रूपयांची रोख रक्कम जप्त केल्याचा तपशील पोलिसांनी पुरवला.