डाळिंब उत्पादक होणार निर्यातदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:37 AM2018-10-13T11:37:51+5:302018-10-13T11:38:56+5:30
पुढचे पाऊल : शेतकऱ्यांनीच निर्यातदार व्हावे म्हणून सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने पाऊल उचलले आहे.
- नितीन काळेल (सातारा)
डाळिंबातून चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा तयार करतात. मात्र शेतकऱ्यांना कमी, तर व्यापाऱ्यांनाच जास्त पैसे मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीच निर्यातदार व्हावे म्हणून सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने पाऊल उचलले आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निर्यातदार बनविण्यात येणार आहे. व्यापाऱ्याला फळे न देण्याने दुप्पट, तिप्पट पैसे शेतकऱ्यांच्या खिशात राहणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. अनेक शेतकरी पूर्णपणे डाळिंब पिकांवर अवलंबून आहेत. अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब युरोप, आखाती देशात निर्यात होत आहेत. मात्र हे डाळिंब व्यापाऱ्याच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती दर लागत नाही. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलले आहे. या कार्यालयाने जिल्ह्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांना डाळिंब उत्पादनाविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना डाळिंबाचे व्यवस्थापन, खते, औषधे यांची कागदपत्रे, पत्रव्यवहार, डाळिंब निर्यात करायचे असतील तर त्याच्या अटी काय आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
बाहेरील देशात डाळिंब निर्यात करावयाचे झाल्यास त्याचे वजन २५० ग्रॅमच्या पुढे असणे आवश्यक आहे. ते कीडरोग मुक्त व कीडनाशक उर्वरित अंशी असणेही गरजेचे आहे, असे डाळिंब कंटेनरमधून पाठविली जातात. कंटेनरमध्ये साधारणपणे १२ ते २० टन डाळिंब पाठविली जातात. त्याची वाहतूक पाच डिग्री सेल्सिअस अंशामध्ये केली जाते, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हाच यामागील उद्देश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.