आता राज्यातील खासगी डॉक्टर संपावर
By admin | Published: March 23, 2017 03:28 AM2017-03-23T03:28:47+5:302017-03-23T03:28:47+5:30
डॉक्टरांसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येतील, असे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर तीन दिवसांपासून पुकारलेला संप
मुंबई : डॉक्टरांसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येतील, असे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर तीन दिवसांपासून पुकारलेला संप निवासी डॉक्टरांनी बुधवारी मागे घेतला, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्यानुसार रात्री आठ वाजेपासून बहुतांश डॉक्टर कामावर रुजू झाले. मात्र, या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरातील ४० हजार खासगी डॉक्टरांनी गुरुवारपासून कामबंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरूच राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई, धुळे, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद येथे रुग्णांच्या नातेवाइकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी संपकरी डॉक्टरांवर ताशेरे ओढले होते. तर, बुधवारी राज्य शासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. अनेक डॉक्टरांना निलंबित केले तर, अनेकांना नोटिसा बजावल्या. तसेच रात्री आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा ६ महिन्यांचा पगार कापला जाईल, असा इशाराही डॉक्टरांना राज्य सरकारकडून देण्यात आला होता.
मात्र नंतर, राज्यभरातील रु ग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ११०० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील, असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आल्यानंतर निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला. प्रत्येक रुग्णालयात सुरक्षा समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या समितीची बैठक दर महिन्यास घेऊन सुरक्षाविषयक बाबींची चर्चा करून संस्थास्तरावरील उपाय अधिष्ठातांना सुचविले जातील, असा निर्णय महाजन यांनी डॉक्टरांसोबतच्या या उच्चस्तरीय बैठकीत घेतला आहे.
शासनाच्या आश्वासनानंतर निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला असला तरी, उच्च न्यायालयाने शासकीय, महापालिका रुग्णालयांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना आखण्याचे आदेश देऊनही सरकारने याची दखल घेतली नाही. यामुळे या डॉक्टरांना संरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बुधवार सायंकाळपासून संप पुकारला. त्याला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारपासून राज्यभरातील ४० हजार डॉक्टर बेमुदत बंद ठेवणार आहेत. परिणामी खासगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे सेंटर, सोनोग्राफी सेंटर बंद राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्यसेवा ठप्प होईल. (प्रतिनिधी)