आता मिथेनॉल निर्मिती करा; नितीन गडकरी यांचे राज्य सरकारला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 12:38 PM2022-06-05T12:38:05+5:302022-06-05T12:39:21+5:30
Nitin Gadkari : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेत ते बोलत होते.
पुणे : जगात अमेरिका, कॅनडा, चीन येथे सर्व ट्रक मिथेनॉलवर चालतात. तर भारतातही आता आसाममध्ये कोळशापासून मिथेनॉल निर्मिती सुरू झाली आहे. मिथेनॉलचा दर २४ रुपये प्रति लिटर आहे. त्यामुळे हे खूप परवडणारे आहे. त्यामुळे राज्यात मिथेनॉलवर आधारित अर्थव्यवस्था सुरू करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात आरसीएफ, व दीपक फर्टीलायझर्स या कंपन्या मिथेनॉल तयार करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात विदर्भातील कच्च्या कोळशापासून मिथेनॉल करता येईल. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे.
सरकार म्हणून सर्वांच्या सोबत आहे, शक्यत ते सर्व करू : मुख्यमंत्री ठाकरे
मला आनंद आहे की शरद पवार यांनी साखरेचा गोडवा राजकारणात आणला आहे, सर्व पक्षांचे नेते पक्षीय जोडे बाजूला काढून राज्याच्या, देशाच्या हिताच्या गोष्टी करताहेत, हेही नसे थोडके. त्यासाठी सरकार म्हणून सर्वांच्या सोबत आहे. जे शक्य आहे, ते नक्कीच करू, असा निश्चय सर्वांनीच केला आहे. त्याला यश मिळो, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ठाकरे म्हणाले, केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे.
हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस तोडणीचे नियोजन हवे : पवार
राज्यात भविष्यात उसाचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात ऊस तोडणीचे नियोजन हंगाम सुरू होण्याआधी करावे लागेल. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे ऊस तोडणी आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे.
साखर आयुक्तालय आणि साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असा सल्ला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला.