आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 03:07 PM2024-05-01T15:07:09+5:302024-05-01T15:08:14+5:30
Anil Parab on Raj Thacekray: १७ मे रोजी शिवतीर्थावर सभेसाठी मनसेने अर्ज केला आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक जाहीर झाली तेव्हाच याची तयारी केली होती. यामुळे हे मैदान कोणाला मिळणार, यावरून ठाकरे शिवसेना आणि मनसेमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभेला भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. कार्यकर्त्यांना त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेशही दिले आहेत. यामुळे ठाकरे गट शिवसेना एकाचवेळी मनसे, शिंदे गट शिवसेना यांच्याशी दोन हात करणार आहे. शिंदे गटाने अख्खी शिवसेनाच फोडून नेल्याने आधीच अडचणीत असलेल्या ठाकरेंना आता आधी फुटलेल्या मनसेविरोधातही लढावे लागणार आहे. याची सुरुवात शिवतीर्थावरील सभेची तारीख बुक करण्यावरून झाली आहे.
१७ मे रोजी शिवतीर्थावर सभेसाठी मनसेने अर्ज केला आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक जाहीर झाली तेव्हाच याची तयारी केली होती. यामुळे हे मैदान कोणाला मिळणार, यावरून ठाकरे शिवसेना आणि मनसेमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. राज ठाकरेंनी मागील सभांमध्ये मी इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही, असे स्पष्ट केले होते. मग लोकसभेचा उमेदवार नसताना, लोकसभा लढवत नसताना आता कोणाची पोरं कडेवर खेळवणार आहात असा सवाल ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांनी केला आहे.
राज ठाकरे शिवतीर्थावर आता कोणाची सभा घेणार आहेत, असा सवाल परब यांनी केला आहे. दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्याच दिवशी आम्ही महापालिकेकडे शिवतीर्थ आम्हाला सभेसाठी मिळावे यासाठी अर्ज केला आहे. सगळे काही रेकॉर्डवर आहे. आम्ही रस्त्यावर सभा घेणार नाही. आम्हाला आमची पोरं आहेत, असे सांगत परब यांनी राज ठाकरेंना डिवचले आहे. तसेच शिवतीर्तावर सभा घेता आली नाही तर आम्ही बीकेसी किंवा अन्य मैदानांचा विचार करू, असे परब म्हणाले आहेत.
तसेच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना आता मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. रविंद्र वायकर, यामिनी जाधव, राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला आता किरीट सोमय्या यांनी स्टार प्रचारक म्हणून यावे, अशी खोचक टीका परब यानी केली.