पडळकरांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर आता दानवेंनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 10:59 AM2020-06-27T10:59:23+5:302020-06-27T11:09:23+5:30
पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आता पडळकरांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई - भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पडळकरांनी केलेल्या विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आता पडळकरांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
गोपिचंद पडळकर यांच्या विधानाबाबत रावसाहेब दानवे म्हणाले की, शरद पवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. त्यांनी राज्यासाठी योगदान दिले आहे. पडळकरांनी केलेलं विधान योग्य नाही. कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबाबत असे विधान करता कामा नये. पडळकरांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी भारतीय जनता पक्षाचा संबंध नाही. ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे. याबाबत आमचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पडळकरांनीही आपण अनावधानाने हे विधान केल्याचे सांगत खेद व्यक्त केला आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे विधान भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी केले होते. त्यानंतर त्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या विधानावरून आक्रमक भूमिका घेतल्यावर भाजपाने पडळकरांचे ते वक्तव्य वैयक्तिक विधान आहे, त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, असे सांगत हात झटकले होते. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असे विधान करणे बरोबर नसल्याचे सांगितले होते.
दरम्यान, चीनसोबत निर्माण झालेल्या तणावावेळी काँग्रेसने विरोधाचे राजकारण न करता सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. चीनने नेहरूंच्या काळातही हल्ला केला होता, आपण आपल्या देशाच्या लष्करावर विश्वास ठेवला पाहिजे. तसेच मोदी कुठल्याही देशाचे आक्रमण परतवून लावू शकतात, असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या