आता सेवा हमी झाली आॅनलाइन
By admin | Published: October 4, 2015 02:41 AM2015-10-04T02:41:52+5:302015-10-04T02:41:52+5:30
राज्य शासनाने आणलेल्या सेवा हमी कायद्यांतर्गतच्या सेवा आॅनलाइन पुरविण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आले.
मुंबई : राज्य शासनाने आणलेल्या सेवा हमी कायद्यांतर्गतच्या सेवा आॅनलाइन पुरविण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आले. अशी आॅनलाइन सेवा देणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे.
यासंबंधीच्या वेबपोर्टलचे लोकार्पण झाले असून, लवकरच मोबाइल अॅपवरही ही सुविधा दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी जाहीर केले. ते म्हणाले की, सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून २२४ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यांचा आॅनलाइन लाभदेखील घेता येईल.
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शक सेवा देताना सामान्य नागरिकांचा आदर करून आणि त्यांना सौजन्याची वागणूक देणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकटीच्या पलीकडे विचार करून विविध सेवांसाठी जे अर्ज आहेत, त्यांचे सुलभीकरण करणे आवश्यक आहे. हे अर्जाचे नमुने बहुभाषिक असावेत, अशी सूचनाही मुख्य सचिवांनी केली. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम या वेळी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
सेवा हमी कायद्याद्वारे ४६ प्रकारचे दाखले निर्धारित वेळेत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जन्म-मृत्यू, ज्येष्ठ नागरिक, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, शेतकरी असल्याचा दाखला, भूमिहिन प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, रहिवास प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, रहिवासी प्रमाणपत्र, हयातीचा दाखला, ग्रामपंचायतींकडून येणारे दाखले, विधवा असल्याचा दाखला, मुद्रांक नोंदणी आदी ४६ सेवा या कायद्याच्या पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत.