आता खुद्द शरद पवारांनी नवाब मलिकांना दिला पाठिंबा, म्हणाले, अधिकारांचा गैरवापर करणाऱ्यांना उघड करण्याचे काम मलिक करत आहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 02:12 PM2021-11-17T14:12:45+5:302021-11-17T14:14:03+5:30
Sharad Pawar Support to Nawab Malik: शरद पवार यांनी मलिकांनी Sameer Wankhede, NCB आणि BJPविरोधात उघडलेल्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांना पाठिंबा दिला आहे.
नवी दिल्ली - गेल्या महिन्यात मुंबईतील आलिशान क्रूझवर सुरू असलेल्या पार्टीवर एनसीबीने कारवाई करून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मलिक यांनी आरोपांची ही मालिका अद्याप सुरूच असून, यादरम्यान मलिकांनी आपला मोर्चा भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही वळवला आहे. मात्र नवाब मलिकांकडून सुरू असलेल्या आरोपांच्या धुमधडाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना अद्याप जाहीर प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान, आज शरद पवार यांनी मलिकांनी समीर वानखेडे, एनसीबी आणि भाजपाविरोधात उघडलेल्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांना पाठिंबा दिला आहे.
नवाब मलिकांकडून सुरू असलेल्या आरोपबाजीचे दिल्लीतील पत्रकार परिषदेमधून पवार यांनी समर्थन केले आहे. जिथे अधिकारांचा गैरवापर होत आहे, अशा बाबी उघड करण्याचे काम नवाब मलिक करत आहेत. नवाब मलिक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन केंद्र सरकारने संबंधितांवर तातडीने कारवाई केली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. खुद्द शरद पवार यांनी नवाब मलिक यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे समर्थन केल्याने आता नवाब मलिक समीर वानखेडे आणि भाजपाविरोधात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल भाजपाच्या मुंबईत झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात ठराव मांडण्यात आला होता. या ठरावाचीही शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. या ठरावाबाबत मी आज सकाळी वर्तमानपत्रामध्ये वाचलं. तेव्हा एक विनोद वाचल्याचा आनंद झाला असा टोला शरद पवार यांनी लगावला.