सकाळ संध्याकाळ त्यांचा भोगा आवाहन करतो; आता पवार, ठाकरे का घाबरतायत; सोमय्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 04:35 PM2022-06-29T16:35:32+5:302022-06-29T16:36:06+5:30
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विरोधी पक्ष भाजपने केलेली मागणी राज्यपालांनी मान्य केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. आता फ्लोअर टेस्टवरून राज्यातील राजकारण रंगत आहे. दरम्यान, यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
“शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे घाबरतात हे मला कळत नाही. आमदार आले की ते आम्हाला मतदान करतील असं सकाळ संध्याकाळ त्यांचा भोंगा आवाहन करत असतो. फ्लोअर टेस्ट होऊन जाऊदे एकदा. आता का घाबरताय. कारण ठाकरेंच्या पोटात पाप आहे. काल पर्यंत ओरडणारे ठाकरे कुटुंबीय गप्प का?,” असा सवालही सोमय्या यांनी केला. राज्यपालांनी बहुमत घ्या सांगितलं, संपूर्ण शिवसेनेचा ठाकरेंवर अविश्वास आहे हे सांगा असंही ते म्हणाले.
राज्यपालांचं पत्र
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान भवन सचिवालय यांना पत्र पाठवले आहे. राज्यात कमालीची अस्थिरता आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांनी इ मेल द्वारे तर विरोध पक्ष असलेल्या भाजपाने पत्राद्वारे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचा जावा केला आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी विरोधी पक्षाने केली. माध्यमांमधील बातम्या पाहता मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणी अपरिहार्य असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे, असे राज्यपाल यांनी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.