आता एकच मिशन... अकरावी अॅडमिशन
By Admin | Published: June 14, 2017 12:29 AM2017-06-14T00:29:13+5:302017-06-14T00:29:13+5:30
वर्षभर अभ्यास करून मेहनत करून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले घवघवीत यश जेमतेम काही दिवसच त्यांना ‘सेलिब्रेट’ करता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्षभर अभ्यास करून मेहनत करून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले घवघवीत यश जेमतेम काही दिवसच त्यांना ‘सेलिब्रेट’ करता येणार आहे. कारण सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा निकाल चांगला लागला त्याचबरोबर दहावीत तब्बल १९३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के तर अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण मिळविले. त्यामुळे आता नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागणार असल्याचे चित्र आहे.
अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागात २ लाख ९२ हजार जागा उपलब्ध आहेत. त्या आॅनलाइन आणि आॅफलाइन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. यंदाही उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि जागा यांच्यात तफावत आहे.
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत आत्तापर्यंत सीबीएसईचे ३ हजार ३३८, आयसीएसईचे ७ हजार ६३३, आयजीसीएसईचे ७२३ विद्यार्थी सहभागी झाल्याची नोंद झाली आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसह अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही चांगले गुण प्राप्त झाले आहेत.
मुंबई आणि उपनगरातील
केसी, सिडनहॅम, एचआर, रूपारेल, रुईया, हिंदुजा, मिठीबाई, साठ्ये, केळकर, कीर्ती अशा महाविद्यायलांमध्ये प्रवेशासाठी चुरस असेल. दहावीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा विचार करता प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. मुंबई विभागातच पालघर, रायगड आणि अन्य काही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.