आता RTO कार्यालयात बसूनच द्या ड्रायव्हिंग टेस्ट; वेळ अन् इंधन दोन्हींची बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 03:47 PM2022-03-24T15:47:32+5:302022-03-24T15:48:00+5:30
आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग टेस्टसाठी सेम्युलेटर मशीन उपलब्ध झाली आहे. या मशीनमुळे चारचाकी वाहन कसे चालवायचे, याची माहिती मिळत आहे.
राज्य शासनाने वाशिममधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सेम्युलेटर नावाची मशीन उपलब्ध करून दिली. चारचाकी वाहनांसाठी पक्के लायसन्स काढणाऱ्या उमेदवारांसाठी ही सोय उपलब्ध झाली आहे. सेम्युलेटर मशीनच्या साहाय्याने चारचाकी वाहन हाताळण्याबाबत व वाहतूक नियमांबाबत सराव करता येणे शक्य झाले आहे. सेम्युलेटर मशीन उपलब्ध झाली असली तरी अवजड वाहनांची ड्रायव्हिंग टेस्ट मात्र सेम्युलेटर मशीनवर देता येणार नाही. ती बाहेर मैदानावरच द्यावी लागत आहे. केवळ हलक्या चारचाकी वाहनांची टेस्ट आरटीओ कार्यालयात बसून देता येईल.
१० ड्रायव्हिंग टेस्ट होतात दररोज
वाशिम येथील आरटीओ कार्यालयात वाहनांच्या दररोज १० पेक्षा अधिक ड्रायव्हिंग टेस्ट सेम्युलेटर मशीनच्या साहाय्याने घेतल्या जात आहेत. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कशी होते ड्रायव्हिंग टेस्ट
आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग टेस्टसाठी सेम्युलेटर मशीन उपलब्ध झाली आहे. या मशीनमुळे चारचाकी वाहन कसे चालवायचे, याची माहिती मिळत आहे. या मशीनवर बसल्यानंतर चारचाकी वाहन चालवत असल्यासारखे वाटते. सिग्नलवर कधी थांबायचे, स्पीड ब्रेकर वळणावर वाहन कसे चालवायचे, याची माहिती मिळत आहे.
वेळ आणि तेल दोन्हींचीही बचत
आरटीओ कार्यालयात सेम्युलेटर मशीन उपलब्ध झाली असून, मैदानात जाऊन चारचाकी वाहनांची टेस्ट घेण्याची गरज उरली नाही. आरटीओ कार्यालयात बसूनच चारचाकी वाहन चालविण्याची टेस्ट देता येणे शक्य झाले असून, तेल व वेळेची बचत होत आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सेम्युलेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मशीनवर मात्र अवजड चारचाकी वाहनांची टेस्ट देता येणार नाही. त्यासाठी मैदानावरच जावे लागेल. कमी वजनाच्या चारचाकी वाहनांची टेस्ट मशीनवर देता येईल. - ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी