आता गीत भीमायन
By admin | Published: May 21, 2017 12:35 AM2017-05-21T00:35:17+5:302017-05-21T00:35:17+5:30
भारतीय घटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारंभाचे औचित्य साधून या महामानवाच्या जीवनावर आधारित
- राहुल रनाळकर। लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारंभाचे औचित्य साधून या महामानवाच्या जीवनावर आधारित ‘गीत भीमायन’ची निर्मिती करण्यात येत आहे. गीत भीमायनमध्ये तब्बल शंभर गाण्यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे प्रख्यात गायकानी गायलेली ही गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांवर लिहिलेल्या गाण्यांची संख्या दहा हजारांहून अधिक आहे. त्यातील शंभर गाणी ‘गीत भीमायन’साठी निवडण्यात आली आहेत. बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत प्रत्येक प्रसंग वामनदादांनी अलगदपणे गीतांसाठी उचलेले आहेत. वामनदादांच्या गाण्यांवर पीएचडी केलेल्या डॉ. संजय मोहोड यांनी या गाण्यांसाठी संयोजन केले आहे. ‘गीत भीमायन’ची संकल्पना सुरुवातीला मांडली ती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांनी. या विद्यापीठाकडूनही काहीतरी व्हायलाच हवे, असा विचार पुढे आला. त्यातून ‘गीत भीमायन’ची संकल्पना समोर आली. विद्यापीठाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांना गीत भीमायनच्या निमित्ताने दिग्गज गायकांबरोबर गाण्याची मोठी संधीही निर्माण झाली.
प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांनी गायलेल्या ग. दि. माडगुळकरांच्या ‘गीत रामायणा’प्रमाणेच ‘गीत भीमायन’ देखील लोकप्रिय होईल, असा विश्वास डॉ. संजय मोहोड यांनी व्यक्त केला आहे.
दिग्गज गायकांचे सूर
‘गीत भीमायन’मधील २० गाणी आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत. यातील प्रत्येकी ५ गाणी सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती व रवींद्र साठे यांनी गायली आहेत. तर ४ गाणी शुभा जोशी आणि १ गाणं सावनी शेंडे यांनी गायले आहे. पुढच्या २० गाण्यांचे काम सुरू आहे. त्यात हरिहरन, साधना सरगम, शौनक अभिषेकी आणि आशा भोसले यांचा सहभाग असणार आहे.
अर्थपूर्ण गाण्यांचा साज
एकीने राहा, असं सांगताना वामनदादा म्हणतात, ‘सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा...’ या गीतातील एक कडव आहे - ‘नगरी, सातारी, कोकणी, मोगलाई सारी जुनी, अमरावती आणि चांदा एकतेने येथे नांदा...’ आता ही फक्त गावांची नावे नाहीत. ही त्याकाळी रिपब्लिकन पाटीर्ची असलेली शक्तीकेंद्रं आहेत. नगरी, सातारी, कोकणी म्हणजे नगरचे दादासाहेब रुपवते, सातारचे बी. सी. कांबळे, कोकणचे आर. डी. भंडारे, मोगलाई म्हणजे औरंगाबादचे बी. एस. मोरे, अमरावतीचे रा. सू. गवई, चंद्रपूरचे बॅरिस्टर खोब्रागडे ही अशी सगळी मंडळी दोन ओळींमध्ये वामनदादांनी गीतबद्ध केली आहेत.