शिक्षक प्रशिक्षणासाठी आता राज्याचे चॅनेल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:23 AM2020-01-24T06:23:15+5:302020-01-24T06:23:35+5:30
राज्यातील बदलत्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारच्या काळात ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड केली.
- सीमा महांगडे
मुंबई : राज्यातील बदलत्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारच्या काळात ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड केली. मात्र नवीन सरकार आल्यानंतर त्याच धर्तीवर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या विविध कार्यक्रमांकरिता महाराष्ट्राचे नवीन टीव्ही चॅनेल लवकरच सुरू होणार आहे.
बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत व्हर्च्युअल शिक्षक प्रशिक्षणासाठी मागील सरकारच्या काळात ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीची निवड झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. वाहिनी महाराष्ट्रात दिसत नसल्याने शाळांनी डीटीएच बॉक्स बसवावा, ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ‘जिओ टीव्ही’ अॅपमधून वाहिनी बघावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. यामुळे जोरदार टीका झाली. महाराष्ट्रात दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी असताना व ती राज्यभर पोहोचत असूनही गुजराती वाहिनीची मदत घेण्याचे कारण काय, असा सवाल शिक्षण तज्ज्ञांनी उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर ‘वंदे गुजरात’च्या ऐवजी महाराष्ट्राचे स्वत:चे चॅनेल असावे, ज्यावरून शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देता येईल, असा ठराव शिक्षण विभागाच्या बैठकीत झालो. राज्याच्या विद्या परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये उपसचिवांनी (प्रशिक्षण) सदर प्रस्ताव मांडला असून त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या नवीन चॅनेलच्या प्रकल्पात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सामाजिक न्याय, आदिवासी विकास या विभागांचाही यात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून सर्वच विभागांच्या शिक्षकांना या चॅनेलकडून मिळणाºया प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.
दरम्यान, बैठकीचा इतिवृत्तांत, चॅनेलसाठी केंद्राकडून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे समजते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला चॅनेलसाठी आवर्ती ५० लाखांपर्यंतची तरतूद करावी लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन चॅनेल सुरू करण्यासाठी विद्या परिषद, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालयातील काही अधिकारी यांनी गांधीनगर, गुजरात येथे अभ्यास दौºयासाठी जावे, असे शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडून सूचित करण्यात आले आहे.