आता स्टॉक एक्सचेंजची सफर शक्य
By admin | Published: January 19, 2016 03:31 AM2016-01-19T03:31:59+5:302016-01-19T03:31:59+5:30
देशाच्या आर्थिक घडामोडींचे केंद्र असलेली बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची इमारत पर्यटकांना खुली करण्याबाबत सामंजस्य करार करण्यास आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या
मुंबई : देशाच्या आर्थिक घडामोडींचे केंद्र असलेली बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची इमारत पर्यटकांना खुली करण्याबाबत सामंजस्य करार करण्यास आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते.
पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितील डेक्कन ओडिसी व त्याचे बोधचिन्ह यांच्या नोंदणीसाठी शासनाच्या ट्रेडमार्क विभागाकडे नोंदणी करणे, घृष्णेश्वर-वेरूळ परिसरात पर्यटन विकास महामंडळाच्या पडिक जमिनीवर महादेव वनाची निर्मिती करण्याकरिता वनविभागास जागा उपलब्ध करून देणे, माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी शौचालय सुविधा विकसित करणे, घारापुरी बेटावरील गावकऱ्यांना महामंडळामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यास मान्यता देण्यात आली.
पर्यटक निवासात दूरसंचार टॉवर उभारणे, उपहारगृह अल्पमुदतीवर भाडेपट्टा परवाना पद्धतीने चालविण्यास देणे, स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र व्यावसायिक तत्त्वावर चालवून, प्रशिक्षण केंद्रास समुद्र संशोधन, सागरी जीव व सागरी जीवशास्त्राचा व सागरी पर्यटनामध्ये डिप्लोमा व पदव्युत्तर अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न करणे, महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळी असलेल्या खासगी हॉटेल्सचे आरक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावरून करणे आदी विषयांना मान्यता देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)