आता तरी ‘दादागिरी’ थांबवा
By admin | Published: January 20, 2017 12:17 AM2017-01-20T00:17:51+5:302017-01-20T00:17:51+5:30
शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम तोडा आणि फोडाचे राजकारण केले.
पिंपरी चिंचवड : शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम तोडा आणि फोडाचे राजकारण केले. स्थानिक पातळीवर सातत्याने गटबाजीला प्रोत्साहन दिले. महापालिकेत दलालांना बसवून निष्ठावान कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले अनेक दिग्गज मोहरे पक्षाबाहेर गेले. ज्यांनी सगळ्यांसाठी खड्डे खोदले, त्यांनी आज स्वत:साठी मोठा खड्डा तयार करून घेतला. दलालांमुळे पक्षाची वाताहत झाली आहे, आता तरी दादागिरी थांबवा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता गुरूवारी केली.
पिंपरी येथील पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाल्या, ‘‘शरद पवार यांच्या कार्यपद्धतीच्या प्रभावामुळे पुलोद आघाडी, एस काँग्रेस पुन्हा काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काम केले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना गेल्या काही वर्षांपासून बाजूला ठेवले जात आहे. शहरातील नेतृत्त्वाची दादागिरी, प्रत्येक शब्दातून होणारी अवहेलना आणि सत्तेच्या नशेतून आलेल्या मुजोरीमुळे निष्ठावान कार्यकर्ते खरे बोलण्यासाठी घाबरत आहेत. शहराचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांनी दलालांचे ऐकून माझ्यावर सातत्याने अन्याय केला. परंतु, तरीही मी पक्ष सोडला नाही. स्वत:च्या हातात कायम सत्ता राहावी यासाठी स्थानिक पातळीवर एकमेकांमध्ये भांडणे लावली. त्यांच्यात एकी होऊ दिली नाही. त्यामुळे एकनिष्ठ असलेले आझम पानसरे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासारखे मोहरे पक्षातून गळून पडले. शहराचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याने स्थानिकांसाठी खड्डे खोदले आणि त्यातून स्वत:साठी मोठा खड्डा तयार केला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता गेली आणि या खड्ड्यातच मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न गाडले गेले, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
>हुकूमशाहीमुळे पक्ष कमकुवत
शरद पवार यांनी लोकशाहीच्या तत्त्वावर उभारलेला पक्ष स्वत:च्याच घरातल्या लोकांनी हुकूमशाहीने कमकुवत केला.
पक्षप्रमुखांनी डोळ्यांना झापडे बांधली की काय? असे दिसून येत आहे. चारित्र्य फक्त महिलांना नसते, तर पुरूषांनाही असते, हे नेते विसरले आहेत.
या नेत्याच्या चारित्र्यावर बोलायचे म्हणजे अनेक दिवस कमी पडतील. नेते आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी, पिलावळांनी आणि दलालांनी चारित्र्याची भाषा केल्यास त्यांच्या चारित्र्याचा आलेख जनतेपुढे मांडला जाईल, असे सांगून दादा, आतातरी तुमची दादागिरी थांबवा, अशी टीका चव्हाण यांनी केली.