आता राज्यातील विद्यार्थीही म्हणणार ‘जय हिंद’; गुजरातचा कित्ता गिरवण्याचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 12:48 AM2019-01-02T00:48:09+5:302019-01-02T00:48:41+5:30
विद्यार्थ्यांत देशभक्ती रुजविण्यासाठी गुजरातमधील शालेय विद्यार्थ्यांवर प्रेझेंट सर/मॅडमऐवजी 'जय हिंद' अथवा 'जय भारत' म्हणूनच हजेरी लावण्याचे निर्देश देणात आले आहेत.
मुंबई : विद्यार्थ्यांत देशभक्ती रुजविण्यासाठी गुजरातमधील शालेय विद्यार्थ्यांवर प्रेझेंट सर/मॅडमऐवजी 'जय हिंद' अथवा 'जय भारत' म्हणूनच हजेरी लावण्याचे निर्देश देणात आले आहेत. हाच कित्ता आता महाराष्ट्र सरकारही गिरविण्याच्या तयारीत आहे.
गुजरातमधील या 'जय हिंद'च्या निर्णयाचे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी समर्थन केले आहे. एका वृत्तवाहिनीवर तावडे यांनी सांगितले की, ‘हा निर्णय गुजरात सरकारचे एक चांगले पाऊल असल्याचे मला वाटते. आपणही असा विचार करू शकतो. पण अद्याप ते ठरविण्यात आलेले नाही.
यासाठी अन्य पर्यायदेखील आहेत, त्या पर्यायांचाही विचार करता येऊ शकतो.’
दरम्यान, गुजरातच्या शिक्षण विभागाकडून यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकात ‘जय हिंद’ची बाब नमूद
करण्यात आली आहे. ‘इयत्ता
पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘जय हिंद’ अथवा ‘जय भारत’ बोलून हजेरी लावावी. सरकारी, तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांनाही या सूचनांचे १ जानेवारीपासून पालन करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
देशभक्ती रुजविण्यासाठी प्रयत्न
मुला-मुलींमध्ये लहानपणापासूनच देशभक्ती रुजावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे गुजरातने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंह चुदासमा यांनी हा निर्णय घेतला.
त्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनाही परिपत्रक पाठवण्यात आले. आता हाच निर्णय महाराष्टÑ शासनही घेते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.