आता शहरी भागात शौचालयांसाठी अनुदान
By admin | Published: April 10, 2015 04:14 AM2015-04-10T04:14:43+5:302015-04-10T04:14:43+5:30
नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात यंदापासून पहिल्यांदाच शौचालयासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल.
मुंबई : नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात यंदापासून पहिल्यांदाच शौचालयासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. त्यासाठी एक वर्षात ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील. राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून आगामी एक वर्षात १८२० कोटी रुपये खर्च करण्यात येतील, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत सांगितले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या ४ वर्षांत राज्यात ५६ लाख शौचालये उभारण्याची योजना आहे. यासंदर्भात काँग्रेसचे राहुल बोंद्रे आणि इतर सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. १२-१५ वर्षांपूर्वी शौचालयांसाठी अनुदान मिळालेल्यांची शौचालये आता खराब झाली आहेत. त्यांना पुन्हा अनुदान देणार का, असा प्रश्न बोंद्रे यांनी केला असता लोणीकर यांनी त्याबाबत स्पष्टपणे नकार दिला. १५० शौचालयांची उभारणी करणाऱ्या स्वच्छतादूताला २२ हजार रुपये दिले जातील. शौचालयाचे काम सुरू झाल्यानंतर ५० टक्के तर काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के रक्कम दिली जाईल, असे लोणीकर यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)