आता शाळेला या फक्त वह्या घेऊन!
By admin | Published: June 25, 2015 11:33 PM2015-06-25T23:33:03+5:302015-06-25T23:33:03+5:30
अभिनव कल्पना : जुनी पुस्तके शाळेत वापरणार तर नवीन पुस्तके राहणार घरच्या अभ्यासासाठी
सातारा : मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओेझे कमी करण्यासाठी नानाविध उपाय योजले जाऊ लागले आहेत. कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयाने पाचवीच्या वर्गासाठी एक अभिनव कल्पना योजली आहे. गेल्या वर्षीच्या मुलांना शासनाने दिलेले पुस्तकाचे संच शाळेतील अभ्यासासाठी वापरायचे आणि नवीन मिळणारी पुस्तके विद्यार्थ्यांनी घरीच ठेवायची अशी ही कल्पना आहे. मुलांनी शाळेत येताना फक्त वह्याच आणाव्यात, त्यामुळे दप्तराचे वजन अधिकाधिक कमी होणार आहे. लवकरच ही पद्धत अंमलात आणली जाणार आहे.
‘लोकमत’ने कोवळ्या जिवांवरील दप्तराचे ओझे किती घातक ठरू शकते याबाबत साधार वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक शाळांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. आपल्या शालेय वेळापत्रकात बदल करण्याबरोबरच दप्तराचे वजन कमी करण्यासाठी अनेक पर्याय शोधून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी ही गोष्ट ‘लोकमत’ने वाचकांसमोर मांडल्यानंतर अनेक शाळांनी कार्यालयात संपर्क साधून उत्स्फूर्तपणे आपणही आपल्या शाळेत कसे बदल केले याबद्दल भरभरून सांगितले.
गृहपाठ, स्वाध्याय, प्रकल्पवही अशा जड वस्तू शाळेतच ठेवण्याची सोय अनेक शाळांनी केली आहे. तसेच पिण्याच्या शुध्द पाण्याचीही सोय शाळेत केल्यामुळे पाण्याची बाटली शाळेत आणली नाही तरी चालणार आहे. तर काही शाळांनी निम्मे तास शिकविण्याचे केले आहेत. त्यामुळे दप्तराचे वजन आणि अभ्यासाचा ताण आपोआपच कमी होणार आहे. (लोकमत चमू)
गेल्या वर्षी शासनाच्या वतीने पाचवीसाठी दिलेले पुस्तकाचे संच आता पाचवीत गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासासाठी देण्यात येणार आहेत. नवीन मिळणारी पुस्तके विद्यार्थ्यांनी घरीच ठेवायची आहेत. त्यामुळे शाळेतील पुस्तके शाळेतच राहतील आणि नवीन पुस्तके ही घरी अभ्यासासाठी राहतील. यासंदर्भात लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- एस. व्ही. भातखंडे, मुख्याध्यापक,
सरस्वती विद्यालय, कोरेगाव
‘लोकमत’नं दप्तराचं वाढतं ओझं कमी व्हावं यासाठी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. यामुळे अनेक शाळांनी हा विषय गांभीर्याने घेऊन विविध उपाययोजना केल्या आहे. आमच्या शाळेतही वेगळे पर्याय शोधले असून गृहपाठ, निबंधाच्या वह्या शाळेतच ठेवण्याची सोय केली आहे. वर्गशिक्षकांचे त्यावर नियंत्रण असणार आहे. यामुळे मुलांचे दप्तर हलके होण्यास मदत झाली आहे.
- शहाजी घाडगे, मुख्याध्यापक, श्री समर्थ रामदास विद्यालय, कारी
होमवर्क आणि क्लासवर्क यासाठी पूर्वी वेगळ्या वह्या होत्या. आता यासाठी एकच वही ठेवण्यात आली आहे. तसेच शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी संपूर्ण दप्तर घरी नेण्याची गरज नाही. गरजेपुरतेच एक-दोन विषयाची पुस्तके घरी न्यायची, बाकीचे दप्तर शाळेतच ठेवण्याची सोय केली आहे. अभ्यासासाठी प्रत्येक शनिवारी संपूर्ण दप्तर घरी दिले जाते.
- शिवानी वेल्हाळ, मुख्याध्यापिका, गुरुकुल स्कूल, सातारा
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी एका दिवशी शाळेत निम्मेच विषय शिकविण्याचे नियोजन केले आहे. चित्रकला, हस्तकला, सामान्यज्ञान या विषयांचे दप्तर शाळेतच ठेवता येणार आहे. अभ्यासासाठी त्याचा शाळेतच वापर होणार आहे. जे मोठे विषय आहेत त्याची पुस्तकेही शाळेतच ठेवली जाणार आहेत. अशा प्रकारे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
- दीपक महाडिक, मुख्याध्यापक, जे. डब्ल्यू. आयरन अॅकॅडमी, सातारा