आता लक्ष्य ३३ कोटी वृक्ष लागवडीचे - सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:28 AM2018-08-01T01:28:58+5:302018-08-01T01:29:11+5:30
राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेस मिळणारा प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाली आहे.
मुंबई : राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेस मिळणारा प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाली आहे. या मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच यापुढे दर सहा महिन्यांनी वृक्ष लागवडीचे लेखापरीक्षण केले जाईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
वृक्ष लागवडीतून पर्यावरण रक्षण होत असल्याने सजीवांच्या निरोगी आयुष्यासाठी ही बाब महत्वाची आहे. वृक्षाच्छादन तसेच रोजगार, उत्पन्न वृद्धीही अपेक्षित आहे. याच भावनेतून राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी वनेतर क्षेत्रातही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. पहिल्या टप्प्यात दोन कोटी ८२ लाख, दुसऱ्या टप्यात पाच कोटी ४३ लाख वृक्षांची लागवड केली होती, यंदा १४ कोटी ७१ लाख वृक्षांची लागवड झाल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्याने सर्वाधिक ९६ लाख, नांदेड जिल्ह्याने ८२ लाख झाडांची लागवड केली. मागील दोन वर्षांत लावलेल्या झाडांपैकी सुमारे ७७ टक्के झाडे जगली आहेत. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्याचे वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन २७३ चौरस किमीने वाढले आहे. राष्ट्रीय वन नीतीनुसार ३३ टक्के वनक्षेत्र करण्यासाठी आणखी १३ टक्के वनक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. यासाठी साधारणत: ४०० कोटी वृक्ष लावणे, जगवणे आवश्यक आहे. लावलेली झाडे किती प्रमाणात जगली याच्या तपासणीसाठी जिल्हा, गाव पातळीवर समित्या स्थापन करण्यात येतील. दर सहा महिन्यांनी वृक्ष लागवडीचे आॅडिट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.