आता लक्ष्य ‘हिंदकेसरी’
By admin | Published: January 12, 2017 02:42 AM2017-01-12T02:42:24+5:302017-01-12T02:42:24+5:30
सर्वांच्या सदिच्छेच्या बळावर तीनदा महाराष्ट्र केसरी पद मिळविले. आता हिंदकेसरी किताब पटकाविण्याचे लक्ष्य असल्याचे विजय चौधरी यांनी स्पष्ट केले
पिंपरी : सर्वांच्या सदिच्छेच्या बळावर तीनदा महाराष्ट्र केसरी पद मिळविले. आता हिंदकेसरी किताब पटकाविण्याचे लक्ष्य असल्याचे विजय चौधरी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र केसरीचा सलग तिसऱ्यांदा बहुमान मिळविण्याची हॅट्रिक करणाऱ्या पैलवान विजय चौधरी यांचा चिंचवड येथे नागरी सत्कार करण्यात आला. उद्योजक बाळासाहेब गवारे यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी अखिल गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव गुरव, अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे. हिरामण भुजबळ, राजू शिनकर, नामदेव चौधरी आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना,चौधरी म्हणाले, खान्देशातील मातीत घडलेला मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. हिंद केसरीची तयारी सुरु केली आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालो. महाराष्ट्रातील जनेतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. कुस्ती या खेळावर प्रेम करण्याऱ्या महाराष्ट्रातील जनतेला हिंद केसरीच्या रूपाने आणखी एक आनंद देण्याचा प्रयत्न राहिल. सत्कार हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.
या सत्काराच्या पूर्वी चिंचवडगावातून रॅली काढण्यात आली होती. मोरया गोसावी समाधी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर चौधरी यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी, अध्यक्ष विठ्ठल सायकर यांच्याशी संवाद साधला. रॅलीतून जात असताना, त्यांनी पागे तालमीला भेट दिली. तेथील आखाड्यात जाऊन मल्लांना मार्गदर्शन केले.
मायबोली विकास मंच व शिवसेना चिंचवड विभागाच्या वतीने राजेंद्र चौधरी, दिलीप पाटील, कैलास मोरे, हिरामण भुजबळ, रघुनाथ चौधरी, कैलास आतकर, दिपक चौधरी, प्रकाश चौधरी, धोंडीराम सायकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले
होते. सत्कार सोहळ्यास नागरिकांची चांगली उपस्थिती होती. (प्रतिनिधी)