आता काय करायचं सांगा...?
By admin | Published: October 29, 2016 11:36 PM2016-10-29T23:36:07+5:302016-10-29T23:36:07+5:30
नमस्कार... सर्व रसिक प्रेक्षकांना एक नम्र सूचना.. विनंती.. आर्जव.. आणि धमकीसुद्धा... कृपया प्रयोग चालू असताना आपापले मोबाइल स्वीच आॅफ करावेत किंवा सायलेंट मोडवर टाकावेत
- प्रसाद ओक
नमस्कार... सर्व रसिक प्रेक्षकांना एक नम्र सूचना.. विनंती.. आर्जव.. आणि धमकीसुद्धा... कृपया प्रयोग चालू असताना आपापले मोबाइल स्वीच आॅफ करावेत किंवा सायलेंट मोडवर टाकावेत... असं कानीकपाळी ओरडूनसुद्धा कित्येकदा प्रेक्षकांना काही कळतंच नाही हो... आता काय करायचं सांगा...
एक गंमत सांगतो.. परवा आमच्या एका अत्यंत गंभीर नाटकाचा प्रयोग सुरू
होता आणि अचानक एकाचा मोबाइल वाजला. सुरुवातीला त्याला तो सापडेचना.
रिंग वाजतेच आहे. पँटच्या चारी खिशात. शर्टच्या दोन्ही खिशात. रिंग वाजतेच आहे... कुठेच सापडेना...
तोपर्यंत स्टेजवरचे आम्ही कलाकार नाटक थांबवून त्याच्याकडे असहायपणे पाहतोच आहोत... त्याचं आमच्याकडे लक्ष गेलं आणि त्याने आम्हाला हातानेच ‘थांबा’ अशी खूण केली. आम्हीही नाइलाजाने थांबलो. शेवटी काय आहे तो तिकीट काढून नाटकाला आलाय म्हटल्यावर... नसला तरी त्याला रसिक म्हटलंच पाहिजे... नाही का? आणि रसिक आहे म्हणजेच तो मायबाप आहे... मग, बाप म्हणून त्याची आज्ञा पाळणे आम्हाला भाग होतं. आम्ही थांबलो. आणि शेवटी त्याला काही तरी टोचतंय आपल्याला अशी जाणीव झाली... आणि त्याचा मोबाइल त्याच्या ‘तशरिफ’खाली त्याला सापडला. इथे मला नितंब हा शब्द वापरायचा होता खरं.. पण तो पुरुषासाठी कुठे वापरल्याचं मला आठवत नाहीये म्हणून टाळला. आणखी एक शब्द सुचला होता... पण तो आपण सगळेच वापरत असल्यामुळे तो सभ्य नसावा असं वाटलं म्हणून तोही टाळला... असो...
त्याला मोबाइल सापडला, त्याने तो घेतलासुद्धा. घेतला म्हणजे घेतला कधीच
होता. म्हणजे विकत म्हणतोय मी. आता ‘फुकट’ घेतला... ‘फुकट’ अनेक अर्थांनी. इनकमिंग
कॉल ‘फुकट’ असतो म्हणून. आम्हा कलाकारांच्या मनात आलं की आता हा फोनवर का बोलतोय ‘फुकट’... म्हणून... तो आता नाटकाला आलाय म्हणजे तो फ्री असणार.. फ्री म्हणजे ‘फुकट’ अशा अनेक अर्थांनी... तर त्यांनी फोन घेतला आणि तो त्यावर बोलू लागला. तो हृद्य संवाद साधारण असा होता...
फोनवरचा माणूस : हॅलो... हॅलो.. हा येतंय का रे ऐकू...? अरे हे थिएटरवाले (बीप) असतात रे. जॅमर लावून ठेवतात (बीप) सारखा.. आं... काय म्हणतो...? काय म्हणतो...? काय म्हणतो...? काय म्हणतो काय...? अरे नाही नाही तू काय म्हणतो ऐकू येत नाहीये...
हे सगळं असह्य होऊन आम्ही त्याला बाहेर जायला सांगणार एवढ्यात त्याने पुन्हा एकदा थांबा अशी खूण केली. आम्ही थांबलो. कारण तो रसिक, मायबाप... वगैरे वगैरे... सगळं आता पुन्हा सांगणार नाही हा... समजून घ्या प्लीज.. तर... त्याचा संवाद चालूच होता.
फोनवरचा माणूस : अरे नाय यार नाटकाला आलोय. आ... काय माहीत काय नाव आहे.. ए काय नाव गं.. (त्याने बायकोला विचारलं) आ.. (बायकोने कानात नाव सांगितलं असावं) अरे, ती म्हणते मी नाय वाचलं तिकीट. अप्पांनी काढली रे २ तिकिटं... कोणी तरी आलं होतं म्हणे तिकिटं खपवायला... नाय तर काय.. कोण जातंय असल्या नाटकाला...
आमच्या मनातून एक रसिक केव्हाच गळून पडला...
फोनवरचा माणूस : हा बरं बरं.. संध्याकाळी फोन करतो हा.. मग बसू.. काय...? अरे काय माहीत... थांब एक मिनिट... (पुन्हा बायकोला ) ए.. कोण स्टार आहे गं या नाटकात..? (बायको पुन्हा काही तरी बोलते कानात) अरे, हाय कोणतरी प्रशांत वोक म्हने...
माझ्या मनातून मायबापसुद्धा गळून पडले...
फोनवरचा माणूस : काय आता आपण कुठे ओळखतो या (बीप) कलाकारानला... हा हा.. ठीके.. संध्याकाळी फोन करतो मग बसू.. काय...? हा..बाय... चल...
ओ.. ओ कलाकार... किती वेळ चालणार हे तुमचं नाटक..
मी म्हणतो.. अहो, आता तर सुरू झालंय. अजून दोन तास तरी चालेल.
तो : हात तिच्या आयला...
आम्ही चमकून..वैतागून..रागाने.. अशा अनेक नजरांनी बघतो...
तो : नाही हो आजकाल इंटरवेलमध्ये उठून जाता येत नाही ना हो.. जाम वैताग येतो या सिक्युरिटीचा कधी कधी... बरं करा चालू.. आणि काही तरी इंटरेस्टिंग दाखवा की.. लावणी वगैरे...
त्याची बायको त्याच्याकडे बहुधा रागाने पाहत असावी... त्यावर तो म्हणतो...
तो : ए.. तुला प्रोमिश केला होता ना. १५ दिवस गेलो नाहीये हा लावणी पाहायला.. मग आता यांना रिक्वेष्ट केली तर काय बिघडलं...?
मी राग, अपमान वगैरे सगळं गिळून त्याला म्हणतो. मोबाइल प्लीज सायलेंट मोडवर टाकाल का...? त्यावर तो म्हणतो..
तो : अहो नाही हो. २-४ महत्त्वाचे कॉल येणार आहेत. घ्यावे लागतील... नाहीतर लई नुसकान होईल हो.. तुमचं चालू द्या बिनधास्त...
या आणि अशा अनेकांमुळे रंगभूमीचं आणि कलाकारांचं किती आणि कसं नुसकान होतं.. ते आम्ही काय सांगणार... आता या अशा माणसांचं... काय करायचं सांगा...!!!