आता खबरे सांगणार अवैध दारूचे अड्डे; तपासणी केंद्र, भरारी पथकेही वाढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 05:54 AM2023-03-21T05:54:13+5:302023-03-21T05:54:28+5:30
खारघर, नवी मुंबई येथे अवैध दारु वाहतुकीद्वारे ७६ लाख रुपयांची दारु जप्त करण्यात आल्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता.
मुंबई : पोलिसांकडून एखाद्या गुन्ह्यात खबऱ्यांची मदत घेतली जाते, त्याप्रमाणे अवैध दारु शोधण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग खबऱ्यांचे जाळे निर्माण करेल, अशी माहिती या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. खारघर, नवी मुंबई येथे अवैध दारु वाहतुकीद्वारे ७६ लाख रुपयांची दारु जप्त करण्यात आल्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता.
शंभुराज देसाई म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत अवैध दारुंच्या प्रकरणांमध्ये ७.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या राज्यात १२ तपासणी केंद्र आहेत. आणखी १३ ठिकाणी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. सध्या ४५ भरारीपथके असून १३ नव्या भरारी पथकांची भर पडणार आहे. येत्या पाच महिन्यांमध्ये या विभागातील १०० टक्के पदभरती लवकरच केली जाणार आहे.
मोहफुलांच्या वाईनसाठी अभ्यासगट
राज्यातील गडचिरोली आणि इतर काही ठिकाणी मोहाची फुले उपलब्ध आहेत. याची वाईन तयार करण्यासाठी अभ्यासगट तयार करण्यात आला आहे. या अभ्यासगटाच्या निर्णयानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.