"आता शिवसेनेनं सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात", उद्धव ठाकरेंसोबतच्या ज्येष्ठ नेत्यानं केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 01:39 PM2022-07-23T13:39:20+5:302022-07-23T13:40:42+5:30
Anant Gite: शिवसेनेत दोन गट पडून अनेकजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असताना उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले माजी खासदार अनंत गीते यांनी स्वबळाबाबत मोठं विधान केलं आहे.
रत्नागिरी - उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडून हिंदुत्वाच्या पुन्हा भाजपाशी युती करावी, अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महाविकास आघाडी सोडण्यावरून पक्षात फूट पडली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. दरम्यान, शिवसेनेत दोन गट पडून अनेकजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असताना उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले माजी खासदार अनंत गीते यांनी स्वबळाबाबत मोठं विधान केलं आहे.
यापुढे शिवसेनेनं सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असं मत अनंत गीते यांनी मांडलं आहे. रत्नागिरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गीते म्हणाले की, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे. तसा माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे. माझं मत आहे की, यापुढे शिवसेनेने स्वबळावर सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात. महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरं जावं. माझी खात्री आहे की उभा महाराष्ट्र शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही, असं गीता यांनी सांगितलं.
शिंदे गटाच्या मागणीशी माझ्या मताचा संबंध नाही, असंही गीते यांनी यावेळी स्पष्ट केलं. स्वबळाची मागणी करण्यासाठी बेईमानी करण्याची गरज आहे का, गद्दारी करण्याची गरज आहे का, बापाला नालायक म्हणण्याची गरज आहे का, आईला विकण्याची गरज आहे का, काही गरज नाही. शिंदे गटाला या विषयावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, असेही अनंत गीते यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, रत्नागिरीमध्ये ८० टक्के कुणबी समाज हा शिवसेनेसोबत होता, आताही आहे आणि यापुढेही राहील, असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. आता गीते यांच्या मताबाबत शिवसेना नेतृत्व काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.