आता भूल देण्याचा धोका नाही
By admin | Published: October 19, 2014 01:01 AM2014-10-19T01:01:30+5:302014-10-19T01:01:30+5:30
शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्याचे म्हटले की, अनेकांचा शंकाकुशंकांनी जीव घाबरून जातो. भूलविषयी विविध गैरसमजही लोकांमध्ये आहे, मात्र आज वैद्यकशास्त्र एवढे प्रगत झाले आहे की, भूल देण्याचा धोकाच
बधिरीकरणशास्त्रात प्रगत तंत्रज्ञान : शस्त्रक्रिया झाल्या सुरक्षित
नागपूर : शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्याचे म्हटले की, अनेकांचा शंकाकुशंकांनी जीव घाबरून जातो. भूलविषयी विविध गैरसमजही लोकांमध्ये आहे, मात्र आज वैद्यकशास्त्र एवढे प्रगत झाले आहे की, भूल देण्याचा धोकाच राहिलेला नाही. यामुळे शस्त्रक्रिया अधिकाधिक सुरक्षित झाल्या आहेत, अशी ग्वाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) बधिरीकरणशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नरेश तिरपुडे यांनी दिली.
मेडिकलमध्ये नुकताच जागतिक बधिरीकरण दिवस म्हणून पाळला गेला. त्या निमित्ताने ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. तिरपुडे म्हणाले, वेदनारहित शस्त्रक्रियेसाठी इथरचा वापर सुरू झाला आणि आधुनिक बधिरीकरणशास्त्राचा जन्म झाला. वेदनारहित शस्त्रक्रियेच्या यशस्वी प्रात्यक्षिकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ १६ आॅक्टोबर १८४६ हा दिवस बधिरीकरण दिवस म्हणून पाळण्यात येऊ लागला. ‘सर जॉन स्नो’ यांनी क्लोरोफॉर्म भूलचा यशस्वी वापर इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिच्या प्रसूतीवेदना कमी करण्यासाठी केला होता.‘अलेक्झांडर वूड’ यांनी इंजेक्शन सिरींजचा शोध लावला आणि दुखऱ्या भागाच्या वेदना मॉर्फिनचे इंजेक्शन देऊन कमी करता येतात हे दाखवून दिले. प्रगत बधिरीकरणशास्त्रामध्ये जुनी औषधे मागे पडत गेली. यात ‘क्लोरोफॉर्म’मुळे रुग्णाच्या मृत्यूची संख्या वाढल्याने १९२० मध्ये ते बंद करण्यात आले. सध्याच्या स्थितीत अद्ययावत मशीन आणि नव्या औषधांमुळे भूल देण्याचा धोकाच राहिलेला नाही. (प्रतिनिधी)