आता नोटा बदलण्यासाठी ओळख पत्राच्या कॉपीची गरज नाही
By admin | Published: November 16, 2016 11:22 AM2016-11-16T11:22:04+5:302016-11-16T11:24:08+5:30
बँक कर्मचा-यांनी नोटा बदलून देताना ग्राहकांकडून त्यांच्या ओळख पत्राची किंवा कोणत्याही कागदपत्राची प्रत घेण्याची गरज नाही, असे आदेश 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने सर्व बँकांना दिले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - बँक कर्मचा-यांनी नोटा बदलून देताना ग्राहकांकडून त्यांच्या ओळख पत्राची किंवा कोणत्याही कागदपत्राची प्रत घेण्याची गरज नाही, असे आदेश 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने सर्व बँकांना दिले आहेत. नोटा बदलण्यासाठी आलेले ग्राहक बँक कर्मचा-यांना पुरावा म्हणून ओखळ पत्राची खरी प्रत दाखवत असतील तर त्याची झेरॉक्स कॉपी बँकेने घेण्याची गरज नाही, असे 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने स्पष्ट केले आहे.
ओळख पत्राची प्रत जमा करण्याच्या नादात बँकांबाहेरील गर्दी जास्त प्रमाणात वाढत जात असल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, 'ज्या ग्राहकांचे बँकेत खाते आहे, त्यांच्याकडे ओळख पत्राची पत्र मागितली जात नाही. मात्र ज्या लोकांचे बँकेत खाते नाही त्यांच्याकडून ओळख पत्राची मागणी केली जात आहे', अशी माहिती लक्ष्मी विलास बँकेचे सीओओ यांनी दिली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वसामान्यांनी जरी स्वागत केले असले तरी दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नोटांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नोटा बदलण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर, एटीएम सेंटरबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पहाटेपासूनच लागत आहेत. काळा पैसा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती.