पाच गंभीर आजारांवर आता एकच डोस
By admin | Published: November 23, 2015 12:35 AM2015-11-23T00:35:59+5:302015-11-23T00:40:35+5:30
पेंटाव्हायलंट लस : आरोग्य विभागातर्फे आजपासून प्रारंभ; मोफत वाटप होणार
भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर -पाच गंभीर आजारांच्या प्रतिबंधासाठी आता पेंटाव्हायलंट ही एकच लस दिली जाणार आहे. शासनाच्या आरोग्य विभागातर्फे आज, सोमवारपासून सर्व जिल्हा, तालुका रुग्णालयांसह प्राथमिक आणि उपकेंद्रांत ही लस मोफत दिली जाणार आहे.डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात या आजारांच्या प्रतिबंधासाठी बाळांना दीड, अडीच, साडेतीन महिन्यांनी इंजेक्शनद्वारे त्रिगुणी लसीचा डोस दिला जातो. याशिवाय मेंदूज्वर आणि कावीळ या आजाराच्या प्रतिबंधाची लस स्वतंत्र इंजेक्शनद्वारे द्यावी लागत होती. त्यामुळे बाळाला एकूण सहावेळा इंजेक्शन टोचावे लागत असल्याने कोवळ्या शरीरावर इंजेक्शनने बाळाला खूप त्रास होत असतो. काही काळ गाठही उठते तर दोन ते तीन दिवस बाळ रडत असते.
आता मात्र डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, कावीळ, मेंदूज्वर या पाच आजारांच्या प्रतिबंधासाठी एकच पेंटाव्हायलंट लसची डोस दिली जाणार आहे. त्यामुळे किमान तीन इंजेक्शनपासून बाळाची सुटका झाली आहे. शासकीय रुग्णालयासह नियमित लसीकरणाच्या मोहिमेत ही लस बाळांना मोफत दिली जाणार आहे. केंद्र सरकारचा आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेने सन २०१३ मध्ये पेंटाव्हायलंट लस प्रत्येक राज्यात देण्याचा आदेश दिला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, पुडूचेरी, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू- काश्मीर, दिल्ली या राज्यातील आरोग्य विभागातर्फे शासकीय आणि खासगी रुग्णालयांतून ही लस दिली जात आहे. महाराष्ट्रात आज, सोमवारपासून ही लस देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीन बाळांना प्रातिनिधिक स्वरूपात ही लस देऊन या मोहिमेचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
पाच गंभीर आजारावर पेंटाव्हायलंट ही एकच लस आता शासकीय रुग्णालयांतून आणि शिबिरांतून मोफत दिली जाणार आहे. तीन इंजेक्शनद्वारे हे डोस दिले जातील. पूर्वी सहा इंजेक्शन द्यावी लागत होती. ‘पेंटाव्हायलंट’मुळे तीनवेळाच इंजेक्शन द्यावे लागते.
- डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी