आता दहावीच्या प्रमाणपत्रावरही येणार जन्मठिकाण
By admin | Published: October 5, 2016 05:31 PM2016-10-05T17:31:00+5:302016-10-05T17:31:00+5:30
अकरावी प्रवेश तसेच इतर कारणांसाठी जन्मठिकाणचा पुरावा देताना विद्यार्थ्यांची होणारी अडचण पाहून शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या प्रमाणपत्रावरही जन्मठिकाणची
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 05 - अकरावी प्रवेश तसेच इतर कारणांसाठी जन्मठिकाणचा पुरावा देताना विद्यार्थ्यांची होणारी अडचण पाहून शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या प्रमाणपत्रावरही जन्मठिकाणची नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१७ पासून घेण्यात येणा-या दहावी परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणा-या शाळा सोडल्याचा दाखल्यावर जन्मदिनांक व जन्मठिकाणाची नोंद असते. त्यामुळे हा दाखला विविध कागदपत्रे, परवाना मिळविण्यासाठी ग्राह्य धरला जातो. दहावीनंतर अकरावी किंवा इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर या दाखल्याची मुळ प्रत महाविद्यालयात जमा करावी लागते. अशावेळी विद्यार्थ्यांना पुढील काळात शैक्षणिक किंवा इतर कामासाठी दाखला नसल्याने समस्या निर्माण होतात. काही जण दाखला हरविल्याचे शपथपत्र देवून दुय्यम दाखला मिळवितात. दहावीचे परीक्षा प्रमाणपत्र मात्र विद्यार्थ्यांकडे कायमस्वरूपी राहते. या प्रमाणपत्रावर सध्या केवळ जन्मदिनांक नमुद केलेला असतो. आता मार्च २०१७ पासून प्रमाणपत्रावर जन्मदिनांकाबरोबरच तालुका व जिल्हयासह जन्मठिकाणही नमूद केले जाणार आहे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.