आता ‘त्या’ लढणार अन्यायाविरोधात

By admin | Published: April 8, 2017 02:52 AM2017-04-08T02:52:28+5:302017-04-08T02:52:28+5:30

देशातील १.२ दशलक्ष लहान मुलींना सक्तीने वेश्याव्यवसायाच्या गर्तेत ढकलले जाते.

Now 'those' fight against the accused | आता ‘त्या’ लढणार अन्यायाविरोधात

आता ‘त्या’ लढणार अन्यायाविरोधात

Next

मुंबई : देशातील १.२ दशलक्ष लहान मुलींना सक्तीने वेश्याव्यवसायाच्या गर्तेत ढकलले जाते. जगातील लहान मुलींच्या वेश्याव्यवसायाचे सर्वांत जास्त प्रमाण भारतात आहे. २०१५मध्ये या १.२ दशलक्ष प्रकरणांपैकी फक्त ५५ प्रकरणांमध्ये गुन्हानिश्चिती होऊ शकली. या सगळ्याला उत्तर देण्यासाठी जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या मुलींना वाचविणाऱ्या ‘फ्री अ गर्ल मूव्हमेंट’ आणि ‘सनलाप’ या संस्थांनी जगातील पहिल्या स्कूल फॉर जस्टीस या शैक्षणिक संस्थेची भारतात स्थापना केली आहे. या माध्यमातून बालवेश्याव्यवसायातून सुटका झालेल्या तरुणी अन्यायाविरोधात स्वत: लढा देणार आहेत.
बालवेश्याव्यवसायातील मुलींवर झालेल्या अन्यायाशी लढा देत या वाचविलेल्या मुलींना शिकवून त्यांना वकील आणि सरकारी वकील बनविणे ज्याद्वारे त्या अशा गुन्हेगारांना शिक्षा देऊ शकतील. ‘स्कूल फॉर जस्टीस’ ही सर्व शाळा पातळीवरील मुलींसाठी एक शाळा आहे आणि शैक्षणिक कार्यक्रमही आहे ज्याद्वारे त्यांना विद्यापीठाच्या पातळीवर पोहोचण्यासाठी सर्वतोपरी मदत, ट्युशन आणि निरीक्षण अशा प्रकारे सर्व पाठिंबा दिला जाणार
आहे. एकदा त्या या पातळीवर पोहोचल्या की त्या कायद्यात पदवी मिळवतील आणि त्या सरकारी वकील होण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल ज्यामुळे न्याय मिळवण्यासाठी व भारतातील न्यायव्यवस्थेचा लाभ उठविण्यासाठी त्यांना शक्ती आणि निर्धार मिळू शकेल. स्कूल आॅफ जस्टीस भारतातील नामवंत विधी विद्यापीठांसोबत एक अनोखा कार्यक्रम तयार करण्यासाठी कार्य करत आहे.
हिंदीतील अभिनेत्री मल्लिका शेरावत ‘फ्री अ गर्ल मूव्हमेंट’ची सदिच्छादूत आहे. तिने स्कूल आॅफ जस्टीसला संपूर्ण पाठिंबा आणि सहकार्य देऊ केले आहे. द स्कूल फॉर जस्टीस हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, २०१७ची बॅच या प्लानचे पहिले पाऊल आहे.
पीडितांना शिक्षण देऊन आणि सक्षम करून वकील बनवून त्याद्वारे न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर ताकद देऊन बालवेश्याव्यवसायामागे असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याची संस्कृती निर्माण करायची आहे. याकरिता संपूर्ण देशाला आवाहन करतो की, स्कूल आॅफ जस्टीसला आणि या कार्याला पाठिंबा द्या; कारण मुली हे एकट्याने करू शकत नाहीत. शेवटी कायद्यात सुधारणा होऊन देशात सकारात्मक बदल व्हावा यासाठी सरकारी मदतीचीही गरज आहे, असे ‘फ्री अ गर्ल मूव्हमेंट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रवक्ते फ्रान्सिस ग्रेशियस म्हणाले. (प्रतिनिधी)
>लॉ इंटर्नशिपच्या संधी खुल्या
यासंदर्भातील प्रकरणांसाठी पोलीस ठाण्यांमध्ये ‘सल्लागार’ नेमण्यात यावा. जेणेकरून, या मुली-तरुणींना मार्गदर्शन मिळेल. शिवाय, सल्लागार समितीची नियुक्ती केल्यास त्यात पोलीस ठाण्यातील महिला पोलीस, कायदे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असावा. त्यामुळे या प्रकरणांचा निकाल लागण्यास सोपे जाईल. ‘स्कूल आॅफ जस्टीस’ अंतर्गत कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणींना माझ्याकडे लॉ इंटर्नशिपच्या संधी आहेत, त्यांनी कधीही माझ्याकडे यावे. - मीनाक्षी अरोरा, ज्येष्ठ विधिज्ञ, सर्वोच्च न्यायालय
>या प्रकरणांची प्रक्रिया प्रलंबित न राहण्यासाठी अशा प्रकरणांवर मॉनिटरिंग करण्यासाठी पर्यवेक्षण समितीची स्थापना करण्यात यावी. तसेच, सरकारी यंत्रणावर अवलंबून न राहता या पीडितांनी स्वत: सक्षम व्हावे.
- नीला सत्यनारायण,
माजी सनदी अधिकारी
>भारतातील या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता ‘स्कूल आॅफ जस्टीस’ हे समाजासाठी आशेचे किरण आहे. मात्र केवळ काही संस्थांच्या आधार आणि सहकार्यामुळे ही चळवळ परिपूर्ण होणार नाही, याकरिता समाजातील तळागाळातील लोकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
- अभय मोकाशी, ज्येष्ठ पत्रकार
मला एका महिलेने कामाठीपुऱ्यात सोडले होते, मी मूळची नागपूरची आहे. त्यानंतर तेथे दीड महिना माझ्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले. मात्र तेथे पोलिसांनी छापे टाकले, त्या वेळेस माझी सुटका झाली. त्यानंतर ‘सनलाप’ या संस्थेत मी मोठी झाले. भविष्यात मला वकील बनायचे आहे.
- आशा, स्कूल आॅफ
जस्टीसची विद्यार्थिनी

Web Title: Now 'those' fight against the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.