अब की बार विदर्भ की सरकार
By Admin | Published: June 30, 2014 12:50 AM2014-06-30T00:50:39+5:302014-06-30T00:50:39+5:30
विदर्भावर चर्चा खूप झाली. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य झालेच पाहिजे. ‘अब की बार विदर्भ की सरकार’ असा नारा देत विदर्भवाद्यांनी रविवारी सायंकाळी
जनमंचचा पुढाकार : विदर्भवाद्यांनी घेतली शपथ
नागपूर : विदर्भावर चर्चा खूप झाली. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य झालेच पाहिजे. ‘अब की बार विदर्भ की सरकार’ असा नारा देत विदर्भवाद्यांनी रविवारी सायंकाळी संविधान चौकात स्वतंत्र विदर्भासाठी लढण्याची जाहीर शपथ घेतली.
‘जनमंच’ या सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करण्यात आले. त्यानंतर जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी प्रस्ताविक केले. प्रा. शरद पाटील यांनी शपथेचे जाहीर वाचन केले. त्यांच्यासह उपस्थित विदर्भवाद्यांनीही शपथ घेतली. ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांनी भूमिका विषद करताना सांगितले की, विदर्भाच्या विषयावर बोलून खूप झाले आहे. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. भाजपाने निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. ते आज सत्तेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे. लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुका झाल्यावर काही खरे नाही. त्यामुळे जे करायचे आहे, ते निवडणुकांपूर्वीच करणे आवश्यक आहे. विदर्भाची मागणी केवळ पुढाऱ्यांची मागणी असल्याचे सांगून या आंदोलनाची हेटाळणी केली जात होती.
परंतु आम्ही अमरावती आणि नागपुरात जनमत घेतले. त्यात ८८ टक्के अमरावतीकरांनी आणि ९६ टक्के नागपूरकरांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे आता ही मागणी लोकांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्येष्ठ नेत्यांनीही घेतली शपथ
यावेळी विदर्भवाद्यांनी ‘हर-हर विदर्भ, घर-घर विदर्भ’ आणि ‘अब की बार विदर्भ की सरकार’ या घोषणांनी संविधान चौक दणाणून सोडला. यावेळी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही मार्गदर्शन करीत विदर्भासाठी लढण्याची शपथ घेतली. याप्रसंगी महापौर आ. प्रा. अनिल सोले, किशोर गजभिये, विदर्भ टॅक्सपेयर असोसिएशनचे अध्यक्ष जे.पी. शर्मा, तेजिंदरसिंह रेणू, विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ, दिनेश नायडू, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दीपक निलावार, वेदचे देवेंद्र पारेख, शिवकुमार राव, राहुल उपगल्लावार, जनमंचचे प्रमोद पांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके, अॅड. फिरदौस मिर्झा, राम आखरे, अॅड. गोविंद भेंडारकर, प्रकाश इटणकर, किशोर गुल्हाणे, नरेश क्षीरसागर, प्रवीण महाजन, सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके आदी उपस्थित होते.
अशी घेतली शपथ
‘ मी शपथ घेतो की, विदर्भातील जनतेचे लाचारीचे जिणे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने व सुखाने जगता यावे, याकरिता स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन. या प्रयत्नात पक्ष, धर्म, जात व इतर कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही’ अशी शपथ यावेळी घेण्यात आली. तसेच ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, वेगळ्या विदर्भ राज्यासाठी लावू पणाला प्राण... या गीताने विदर्भवाद्यांमध्ये उत्साह संचारला. (प्रतिनिधी)