आता मंत्रालयातील बैठकींचेही टाइमटेबल
By admin | Published: November 12, 2016 03:54 AM2016-11-12T03:54:39+5:302016-11-12T03:54:39+5:30
राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोमवारी मंत्रालयामध्ये बैठकीसाठी बोलावू नये.
मुंबई : राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोमवारी मंत्रालयामध्ये बैठकीसाठी बोलावू नये. तसेच
क्षेत्रीय स्तरावरील विभागप्रमुखांनीसुद्धा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांना सोमवारी बैठकीसाठी बोलावू नये. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सोमवारी सर्व अधिकारी उपलब्ध असतील याची खात्री जनतेला देता येईल, असे परिपत्रक आज सामान्य प्रशासन विभागाने काढले.
प्रशासकीय विभागांचे सचिव आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या बैठकींचे वेळापत्रक या परिपत्रकाद्वारे ठरवून देण्यात आले आहे.
त्यानुसार, मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक असते, त्यामुळे त्या दिवशी सर्वसाधारणपणे सर्व आमदार मंत्रालयात असतात. त्यांनी
उपस्थित केलेल्या विकास कामांबाबत बैठकी आयोजित कराव्यात. याशिवाय, मंगळवार ते गुरुवार या कालावधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांबरोबर बैठकी आयोजित करण्यात याव्यात.
शुक्रवार ते रविवार या कालावधीत शक्यतो मंत्रालयात बैठका आयोजित करण्यात येऊ नयेत. म्हणजे या कालावधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील कामकाजासंबंधात दौरे आयोजित करता येतील. तसेच मंत्री महोदयांच्या वेळी सर्व अधिकारी उपस्थित राहू शकतील. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सर्व सचिवांची पाक्षिक बैठक साधारणत: प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी आयोजित करण्यात येत असल्यामुळे दुसऱ्या व चौथ्या बुधवारी सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत शक्यतो सचिव अपेक्षित असलेल्या बैठकी घेऊ नयेत, असे निदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सर्व सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)