ड्रोन रोखणार आता रेल्वेचे अपघात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 05:32 AM2018-06-26T05:32:44+5:302018-06-26T05:32:47+5:30
रेल्वे रुळांवरून ट्रेन घसरून होणारे वाढते अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने आयआयटी रूरकीच्या मदतीने ड्रोन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
नारायण जाधव
ठाणे : रेल्वे रुळांवरून ट्रेन घसरून होणारे वाढते अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने आयआयटी रूरकीच्या मदतीने ड्रोन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या ड्रोनच्या माध्यमातून रेल्वे रूळांवर नजर ठेवली जाणार आहे. सध्या या ड्रोनची उत्तराखंडातील रेल्वे मार्गांवर चाचणी सुरू आहे. सार्वजनिक व खासगी भागीदारीतून व रेलटेलच्या सहकार्याने हा ड्रोन विकसित केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या गँगमन रुळांची पाहणी करतात, परंतु दुर्गम भाग, पावसाळ्यात सर्वच रेल्वे रुळांवर नजर ठेवण्यास गँगमन पोहोचू
शकत नाहीत. त्यामुळेच दोन रेल्वे रुळांमधील अंतर, रेल्वे रूळ, स्लीपर, वीजवाहक तारांसह अन्य ठिकाणांवर हा ड्रोन नजर ठेवेल. बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही भागात नक्षलवाद्यांकडून रेल्वे रुळांना हानी पोहोचविली जाते. काही समाजविघातक घटकही रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू टाकत असल्याचे मुंबई परिसरात अलीकडेच निदर्शनास आले
आहे. अशा प्रवृत्तींवरही हा ड्रोनची नजर असेल.
२०१७-१८ मध्ये रेल्वे घसरून ५४ अपघात झाले होते. यात अनेकांना प्राण गमवावे लागले. गेल्या वर्षी त्यांची संख्या ७८ होती. हे अपघात रोखण्यास या ड्रोनची मदत होणार आहे. सुरुवातीला हे ड्रोन भारतीय रेल्वेचा रेलटेल विभाग करणार होता, परंतु या विभागाचे संशोधन आणि विभागात पुरेसे तज्ज्ञ नाहीत. त्यामुळेच त्यांनी हे काम आयआयटी रूरकीकडे सोपविले आहे.
असे रोखणार अपघात
रेल्वे रुळास कुठे तडे गेले आहेत, गॅप वाढला आहे, रुळांवर काही पडले आहे का, डोंगरदऱ्यात दरडी कोसळल्या आहेत काय, वीजवाहक तारा तुटल्या आहेत, याची माहिती छायाचित्रे, व्हिडीओंद्वारे हा ड्रोन रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देणार आहे, नियंत्रण कक्षाचे नेटवर्क इंजिनचालकांशी जोडले गेले असल्याने संभाव्य अपघात रोखणे सोपे होणार आहे.
याशिवाय रेल्वने आपल्या काही विभागांतील गँगमनला जीपीएस बँडही दिले आहे. त्या आधारे रेल्वे अपघात रोखण्याचाही प्रयत्न भोपाळ विभागात होत असल्याचे सांगण्यात आले.
सध्या भारतीय रेल्वेच्या १२,३०० गाड्या ६७,३८१ किमी मार्गावरून धावत आहेत.