प्रवासात सुट्टया पैशांची चिंता नको, आपली ST डिजिटल होणार; UPI, QR कोडनं तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:25 PM2022-08-24T17:25:29+5:302022-08-24T17:25:52+5:30
एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील सभागृहात एका समारंभात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते या मशिन्सचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई – एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत 'डिजिटल' प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमासाठी ५ हजार ॲण्ड्राईड तिकिट मशिन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येणार आहे अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
मे. ईबीक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर इंडिया लि., मे. पाईनलॅब व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने रा.प. महामंडळास ५ हजार नवीन ॲण्ड्राईड आधारीत डिजिटलची सुविधा असणारी तिकिट मशीन्स मिळाल्या आहेत. एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील सभागृहात एका समारंभात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते या मशिन्सचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यस्थापक मनोजकुमार सिन्हा, सहायक महाव्यवस्थापक राजा कुंदन शरण व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच एसटी महामंडळाचे विविध विभागांचे महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चन्ने म्हणाले, सध्या डिजिटलचा जमाना आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे, असे सांगतानाच डिजिटल व्यवहाराला चालना देणे, हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. त्यादृष्टीकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी युपीआय, क्युआर कोड, इत्यादी डिजिटल पेमेंटची सुविधा देणाऱ्या ५ हजार ॲण्ड्राईड आधारीत मशिन्सचा समावेश केला आहे. या सुविधेमुळे एसटी प्रवासात रोखीने व्यवहार कमी होण्यास मदत होणार आहे असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यस्थापक सिन्हा, सहायक महाव्यवस्थापक शरण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नविन ॲण्ड्राईड मशिन्स प्रथम टप्प्यामध्ये अकोला, लातूर, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर व भंडारा या विभागांना वितरीत करण्यात आल्या आहेत.