आता हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचे आंदोलन

By admin | Published: April 15, 2016 02:36 AM2016-04-15T02:36:12+5:302016-04-15T12:38:54+5:30

शनी शिंगणापूरची लढाई जिंकल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आता हाजीअली दर्गा आणि शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.

Now Trupti Desai's movement for the entry of the Haji Ali Dargah | आता हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचे आंदोलन

आता हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचे आंदोलन

Next

कोल्हापूर, दि.१५ - शनी शिंगणापूरची लढाई जिंकल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आता हाजीअली दर्गा आणि शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.  आता त्र्यंबकेश्वर, शबरीमाला आणि मुुंबईतील हाजी अली दर्ग्यातील प्रवेशासाठी आंदोलन केले जाणार आहे. हाजी अली दर्ग्यातील प्रवेशाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर राज्य सरकारने आपले म्हणणे मांडले आहे. येथील प्रवेशाच्या मुद्द्याबाबत काही मुस्लीम महिला संघटना मला भेटल्या आहेत. मुंबईत पुढील आठवड्यात त्यांची बैठक घेऊन आंदोलनाची रणनीती ठरविणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.

‘अंबाबाई देवीच्या मंदिरातील बुधवारची स्थिती पाहता, हिंदुत्ववादी संघटनांनी माझ्या हत्येचा कट रचला होता. मंदिरातील गाभारा प्रवेशावेळी माझ्यावर हल्ला झाला. सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधित हल्ला करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा माझाही दाभोलकर, पानसरे यांच्याप्रमाणे खून होईल,’ अशी भीती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. पूर्ण स्थिती माहीत असूनही बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयात या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

अंबाबाईच्या मंदिरातील गाभारा प्रवेशावेळी बुधवारी रात्री देसाई यांना विरोधी महिलांनी मारहाण केली होती. त्यानंतर, त्यांना रात्री उशिरा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देसाई म्हणाल्या, ‘अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याची पूर्वकल्पना पोलीस, प्रशासनाला दिली होती. तरीही पोलिसांनी १४४ कलम लावून माझ्यासमवेत आलेल्या काही महिलांना ताब्यात घेतले. मंदिरात मला विरोध करणारे बघितल्यानंतर, १४४ कलम केवळ भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनाच लागू होते का? असा प्रश्न निर्माण होतो. मंदिरात गेल्यानंतर पोलीस असतानाही माझ्यावर हल्ला झाला. त्यात गळा दाबला, कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला. या वेळी पोलिसांचे नियोजन चुकीचे होते. शिवाय, ते बघ्याची भूमिका घेतात हे आश्चर्यकारक आहे.

त्यांनी संबंधित हल्लेखोरांना अडवून बाहेर काढले असते, तर हा प्रकार घडला नसता. एकूणच मंदिरातील स्थिती पाहता, हिंदुत्ववादी संघटना आणि मला विरोध करणाऱ्यांनी पूर्णपणे माझ्या हत्येचा कट रचला होता हे दिसून आले. राज्य व केंद्रात आमचे सरकार असल्याचे संबंधित संघटनांकडून बोलले जाते. त्याचा प्रत्यय मला बुधवारी आला.’ 


मारहाणीची स्वतंत्र चौकशी
- प्रदीप देशपांडे
श्रीअंबाबाई देवी मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश प्रकरणावरून तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांना सादर केला जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Now Trupti Desai's movement for the entry of the Haji Ali Dargah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.