टीएमटीत आता जाहिरात घोटाळा, दोन वर्षांपूर्वीचे काम ठेकेदाराला त्याच दरांमध्ये देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 03:49 AM2017-09-18T03:49:01+5:302017-09-18T03:49:03+5:30

मुंब्य्राच्या पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मुंब्रा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदींसह इतर काही प्रस्ताव अंगलट आल्याने प्रशासनाने ते मागे घेण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे मात्र गुरुवारच्याच महासभेत टीएमटीवरील जाहिरातींचे दोन वर्षांपूर्वीचे काम ठेकेदाराला त्याच दरांमध्ये देण्याचा प्रयत्नही प्रशासनाकडून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Now try to pay the contractor at the same rate in the TMT, two years back to the contractor | टीएमटीत आता जाहिरात घोटाळा, दोन वर्षांपूर्वीचे काम ठेकेदाराला त्याच दरांमध्ये देण्याचा प्रयत्न

टीएमटीत आता जाहिरात घोटाळा, दोन वर्षांपूर्वीचे काम ठेकेदाराला त्याच दरांमध्ये देण्याचा प्रयत्न

Next

ठाणे : मुंब्य्राच्या पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मुंब्रा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदींसह इतर काही प्रस्ताव अंगलट आल्याने प्रशासनाने ते मागे घेण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे मात्र गुरुवारच्याच महासभेत टीएमटीवरील जाहिरातींचे दोन वर्षांपूर्वीचे काम ठेकेदाराला त्याच दरांमध्ये देण्याचा प्रयत्नही प्रशासनाकडून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याबाबत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आक्षेप घेतल्यानंतर सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव तहकूब केला आहे. मात्र, असा वादग्रस्त प्रस्ताव मांडून प्रशासनाने आणखी एक संशयाची सुई आपल्याकडे वळवली आहे.
गुरुवारच्या महासभेत अनेक वादग्रस्त प्रस्ताव होते. त्यातील काही मंजूर झाले, तर प्रशासनाने काही प्रस्ताव मागे घेतले. यातच टीएमटीचा जाहिरात प्रदान करण्याचा प्रस्तावदेखील पटलावर होता. १४ आॅगस्ट २०१४ रोजी टीएमटीच्या २९३ बसवर जाहिरातींची निविदा पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली होती. मुदतवाढ दिल्यानंतरही केवळ एकाच ठेकेदाराने हे काम करण्यात स्वारस्य दाखवले होते.
दरम्यानच्या काळात भाडेतत्त्वावर चालणा-या २५ बस बंद झाल्या. त्यामुळे टीएमटीच्या ताफ्यातील २६८ बसवर जाहिरात करण्याचे काम मे. एक्सल अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग या कंपनीला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या जाहिरातीपोटी पालिकेला तीन वर्षांत ५ कोटी ६४ लाख रुपये मिळणार होते. निविदेतील अंदाज रकमेपेक्षा हा दर जास्त आहे. अन्य संस्थांमध्ये यापेक्षा कमी दरात काम केले जाते तसेच २०१४ साली मंदी असल्यामुळे जास्त दर मिळणे अशक्य आहे, अशी कारणे देऊन प्रशासनाने एकमेव ठेकेदारावर कृपादृष्टी दाखवली होती.
टीएमटीचा कारभार सांभाळण्यासाठी नेमलेल्या पाच सदस्यांच्या समितीने ही निविदा मंजूर करून सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्याची शिफारस १७ डिसेंबर २०१५ रोजी केली होती. मात्र, गेल्या २१ महिन्यांत त्याबाबतचा कोणताही निर्णय झाला नव्हता.
टीएमटीच्या ताफ्यात आता नव्या बस दाखल होत असल्याने त्यावर जाहिरात करून चांगला नफा कमावता येईल, या उद्देशाने २१ महिन्यांपूर्वीच्या शिफारशींचा आधार घेऊन मंजुरीचा प्रस्ताव पुन्हा सर्वसाधारण सभेपुढे मांडला होता.
>वारंवार वादग्रस्त प्रस्ताव पटलावर; कामाबाबत शंका
नगरसेवक मुल्ला यांनी त्याला आक्षेप नोंदवून ही निविदा प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. वास्तविक, निविदा प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर ९० दिवसांत कामाची वर्कआॅर्डर दिली नाही, तर ती प्रक्रि या रद्द होते. नियमानुसार जुनी निविदा रद्द करून पालिकेने या कामासाठी नव्याने जाहिरात काढणे अपेक्षित होते. तसे केले असते, तर टीएमटीला वाढीव महसूलही मिळाला असता. मात्र, तसे न करता पालिकेने दोन वर्षांपूर्वीच्याच दरात आणि त्याच ठेकेदाराला काम देण्यामागचे कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर, सभागृहाने प्रशासनाचा हा प्रस्ताव तहकूब केला आहे. एकूणच प्रशासनाकडून मागील काही महिन्यांपासून एकामागून एक असे वादग्रस्त प्रस्ताव पटलावर आणले जात असल्याने त्यांच्या कामाबाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित झाल्या आहेत.

Web Title: Now try to pay the contractor at the same rate in the TMT, two years back to the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.