आता उद्धव ठाकरेंना ‘हिंदूजननायक’ उपाधी; शिवसेना नेत्यानं पोस्ट केला बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 09:12 AM2022-05-13T09:12:16+5:302022-05-13T09:14:00+5:30
आता शिवसेना नेते आणि माजी खासदाराने उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक म्हणून उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
मुंबई – हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्व आणि हनुमान चालीसाभोवती फिरू लागले आहे. राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्व स्वीकारत मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावेत अशी मागणी केली. त्याला भाजपानेही पाठिंबा दिला. मात्र सत्ताधारी शिवसेनेने भाजपा-मनसेवर नकली हिंदुत्वाचा आरोप केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी(Raj Thackeray) हिंदुत्वाची भूमिका घेतल्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंदूजननायक राज ठाकरे अशी उपाधी लावली. मनसेच्या अनेक पोस्टर्सवर हिंदूजननायक म्हणून राज ठाकरेंना पुढे करण्यात आले. मात्र आता शिवसेना नेते आणि माजी खासदाराने उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक म्हणून उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) हिंदूजननायक उल्लेख केला आहे. येत्या १४ मे रोजी मुंबईच्या बीकेसी मैदानात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. तत्पूर्वी पक्षाकडून टीझर, पोस्टर्स जास्तीत जास्त प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.
अलीकडेच शिवसेनेच्या टीझरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचा व्हिडीओ वापरण्यात आल्याचं समोर आलं होते. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा. काहीतरी अस्सल तुमचे असुद्या. इतके ही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हिडिओमध्ये गर्दी मनसेच्या सभेची. अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का..? असा सवाल करत लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली हे नकली हिंदुत्ववादी आहेत असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला होता.
शिवसेनेची १४ मे रोजी सभा
१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. “आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत,” असं उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. दरम्यान, यानंतर शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी टीझर, पोस्टर्स प्रकाशित करणं सुरू केले आहे.