आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 08:16 AM2024-05-17T08:16:38+5:302024-05-17T09:04:35+5:30
Uddhav Thackeray Interview: काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असे भाकीत केले होते. उद्धव ठाकरेंनी बोलता बोलता दोन आकडे सांगितले.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या राजकारणाचे काटे पवारांच्या संघर्षावरून आता ठाकरे-शिंदे संघर्षाकडे वळले आहेत. मुंबईतील सहा जागा, नाशिकसह अन्य शिवसेनेचा प्रभाव असलेल्या बहुतांशी जागांवर मतदान होणार आहे. यातच उद्धव ठाकरेंनी आपल्या सभांना गर्दी होत असल्याचा दावा करतानाच महाविकास आघाडी राज्यात किती जागा जिंकेल याचे भाकीत केले आहेत.
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असे भाकीत केले होते. परंतु उद्धव ठाकरेंचे भाकीत जरा जास्तच आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी हा अंदाज व्यक्त केला आहे.
बाळासाहेबांनी जे उभे केले त्याचे पुढे काय होईल असे त्यांना वाटत होते. मी शिवसेना जशीच्या तशी पुढे घेऊन जाईन असे वचन देत जबाबदारी स्वीकारली. हे मी अमित शाह यांनाही सांगितलेले. तेव्हा त्यांनी त्या खोलीत ज्यांच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल असा प्रस्ताव ठेवला. तेव्हा मी त्यांना असे करू नका, असे सांगत त्यामागचे कारणही सांगितले. जर असा फॉर्म्युला ठेवला तर आपल्यात पाडापाडीचे राजकारण रंगेल. त्यापेक्षा सर्वात स्पष्ट समझोता करू, सत्तेत आल्यावर अडीज वर्षे तुमची, अडीज वर्षे आमची. तसे झाले तर त्याचे पत्र तयार करू, त्यावर पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल. शिवसेनेचा जो मुख्यमंत्री असेल त्याची सही असेल. तसेच त्याच्या मसुद्यात आमचा मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल असे लिहू. त्याचे होर्डिंग करून तुम्ही मंत्रालयाच्या दारावर लावा, असेही सांगितले होते, असे ठाकरे म्हणाले.
यावर शाह यांनी ठीक आहे म्हणत आपण एकमेकांना सांभाळू, असे सांगितले नंतर आम्ही पत्रकार परिषदेला सामोरे गेलो होतो. तेव्हा लोकसभेला दोन तीन महिने होते, तर विधानसभेला चार-पाच महिने. आताच मुख्यमंत्री पद जाहीर करण्याची काही गरज नाही, त्यामुळे पीसीमध्ये पदे आणि जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप केले जाईल एवढेच सांगितले गेले. यात मुख्यमंत्रई पदही येते. ज्याला समसमान चा अर्थ कळतो त्याला तो कळला होता, असा उपरोधिक टोला ठाकरेंनी लगावला.
राज्यात किती जागा जिंकाल असे विचारले असता ४८ पैकी ४८ जागा मविआ जिंकेल असे ठाकरे म्हणाले. जर मी सांगितले ३५ जागा जिंकू, तर मग कोणत्या १३ जागा पडणार याचा अंदाज काढला जाईल. मी अंदाज पंचे सांगत नाही. मी जिंकण्याची तयारी करतो. माझ्या सभांना गर्दी होते, हे माझे कर्तुत्व नाही तर माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत, असे ठाकरेंनी सांगितले.