आता उद्धव ठाकरेच घेतील केमिकल झोनबाबतचा निर्णय
By admin | Published: September 8, 2015 11:37 PM2015-09-08T23:37:57+5:302015-09-08T23:37:57+5:30
रवींद्र वायकर : शिवसेनेला विश्वासात घ्यायला हवे होते..
.रत्नागिरी : भाजपबरोबरच शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकणातील केमिकल झोनबाबत निर्णय घेताना शिवसेनेलाही विश्वासात घ्यायला हवे होते, यात दुमत नाही. याप्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
जिल्ह्यात १,६५,०८६ गणेशांची प्रतिष्ठापना होणार आहे. कोकणातील होळी आणि गणेशोत्सव हे सण मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने जिल्ह्यात येण्याची संख्या लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने विविध विभागांना सुसज्जतेच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कशेडी घाट उतरल्यानंतर एकूण १९ ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. तसेच एस. टी. आणि कोकण रेल्वे या सेवांमध्ये समन्वय व्हावा, यासाठी सर्व एस. टी. फेऱ्या व्हाया रेल्वे स्टेशन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आपण बांधकाम विभागाला सूचना दिल्या असल्याचे सांगितले. यापुढे पाच वर्षांच्या आत रस्त्याची दुरवस्था झाल्यास संबंधित ठेकेदाराने ते दुरूस्त करावेत. त्यासाठी ठेकेदाराबरोबरच संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल, असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेली २९२ गावे वगळून उर्वरित गावांसाठी रॉयल्टी भरून हातपाटी उत्खननासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. आॅक्टोबरअखेर यांत्रिकी उत्खननाला परवानगी देणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात ५६१६ बचत गट आहेत. त्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी त्यांना मुंबईमध्ये बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपबरोबर शिवसेना सत्तेत असली तरी दोन्ही पक्षांची ध्येयधोरणे वेगवेगळी आहेत. त्यामुळे कोणतेही काम करताना शिवसेनेप्रमाणेच केले जाईल. आम्ही जनतेसाठीच बसलोय, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
साकवांकडे दुर्लक्ष झाल्याचे मान्य
जिल्ह्यातील ५९७ साकव नादुरूस्त आहेत, याबाबतचे वृत्त आपल्या निदर्शनास आले आहे. या साकवांकडे लक्ष दिलेले नाही, हे पालकमंत्र्यांनी मान्य केले. या साकवांसाठी साडेआठ कोटीचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी वेगळ्या तऱ्हेची उपाययोजना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.