शिवसेनेच्या संघर्ष काळात आता उद्धव चिरंजीव तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 10:19 AM2022-07-23T10:19:35+5:302022-07-23T10:20:50+5:30
शिवसेनेत असा गट तयार होतोय, अशी कल्पना मी साहेबांना दिली होती. परंतु असं होणार नाही. शिवसैनिक मला धोका देणार नाही अशी भावना उद्धव ठाकरेंची होती असा खुलासा हर्षल प्रधान यांनी केला.
मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ४० आमदार, १२ खासदार यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झालीय. दुसरीकडे शिवसेनेला बळकटी देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. आता तेजस ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री होणार का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी या विषयावर भाष्य केले आहे. प्रधान म्हणाले की, शिवसेना पक्ष म्हणून काम करतेय, कुणी कितीही दावे केले तरी त्याचा फरक पडत नाही. शिवसेना आजही, उद्याही आणि भविष्यातही काम करत राहणार आहे. शिवसेनेत घडत असलेल्या घडामोडीमुळे ठाकरे कुटुंब मनातून दुखावले गेले आहे. तरीही उद्धव ठाकरे कणखर आहेत, रश्मी ठाकरे त्यांच्या पाठिशी ठाम आहेत, आदित्य, तेजसही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत आहेत असं त्यांनी सांगितले तसेच तेजस ठाकरे यांनी राजकारणात यावं ही कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे, पण हा ठाकरे कुटुंबाचा प्रश्न आहे. सगळ्यांनी राजकारणात येण्यापेक्षा राजकीय व्यवस्थेला ताकदवान बनवून ती शिस्तबद्ध चालवणं हे जास्त गरजेचे आहे असं ते म्हणाले.
शिंदेंच्या बंडाची आधीच होती कुणकुण
शिवसेनेत असा गट तयार होतोय, अशी कल्पना मी साहेबांना दिली होती. परंतु असं होणार नाही. शिवसैनिक मला धोका देणार नाही अशी भावना उद्धव ठाकरेंची होती. निवडणुका येऊ द्या शिवसेना पुन्हा खंबीरपणे राज्यात उभी राहील. आता ६३ नाही तर शिवसेना १०० पर्यंत मजल मारेल. आदित्य ठाकरे दिवसेंदिवस प्रगल्भ राजकीय नेते बनत आहेत. ठाकरे कुटुंबाला राजकारण जमलं नाही. आपली माणसं सत्तेत बसावीत म्हणून शिवसेना राजकारणात आली. राजकारणात आपलं कोण असेल तर ती शिवसेना आहे असं मराठी माणसाला वाटतं. कितीही संकटं आली तरी आम्ही शिवसेनेसोबत राहणार आहे अशी भावना हर्षल प्रधान यांनी व्यक्त केली.
बंडखोरांना जनता उत्तर देणार
माझ्याच माणसांनी माझा विश्वासघात केला हे दुखावणारं होतं असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे भावनिक राजकारणी आहेत. ते भावनेने विचार करतात. आम्ही सर्व महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरणार आहोत. सर्वसामान्यांचा पक्ष शिवसेना हेच आमचे धोरण आहे. आपल्याला राजकारण जमले नाही म्हणून ही वेळ आपल्यावर आली आहे. शिवसेना ठाकरे कुटुंबापासून दुरावून नेऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद उद्धव ठाकरेंकडेच आहेत. भात्यातील बाण घेऊन गेले तरी धनुष्य उद्धव ठाकरेंच्या हाती आहे. राज्यातील १३ कोटी जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम उभा आहे. निवडणुकीत बंडखोरांना जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही प्रधान यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
शिवसैनिकाला पदाचा मोह नाही
आदित्य ठाकरेंना मंत्रिपद मिळालं ते ज्यांना पदे मिळाली त्यांच्या मनात खुपत असेल परंतु शिवसैनिकाच्या मनात पदाचा मोह नाही, कुठलंही पद मागत नाही. आजही शिवसैनिक वडापाव खाऊन काम करतो. ज्यांना संधी मिळाली त्यात काहीजण सोने करतात तर काहीजण माती करतात. माती करणारे निघून गेले असंही हर्षल प्रधान यांनी सांगितले.