कृषी विद्यापीठाला आता हक्काचा कुलगुरु
By admin | Published: August 12, 2015 11:16 PM2015-08-12T23:16:13+5:302015-08-12T23:16:13+5:30
निकष बदलले : आॅक्टोबरनंतर प्रलंबित कामांचा होणार निपटारा--लोकमतचा प्रभाव
दापोली : कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी संचालकपदाचा पाच वर्षांचा अनुभव असावा, या अटीमुळे गेल्यावर्षी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी एकही पात्र उमेदवार मिळाला नसल्याचा अहवाल देऊन निवड समितीने भरती प्रक्रिया रद्द केली होती. आता शासनाने कुलगुरुपदाचे निकष बदलले आहेत. नव्या निकषानुसार दापोली कृषी विद्यापीठात १५ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे निवड समितीने जाहीर केल्याने आॅक्टोबरअखेर विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळणार आहे.दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांचा कार्यकाल २० डिसेंबर २०१४ रोजी संपला. त्यांचा कार्यकाल संपण्याआधी तीन महिने नव्या कुलगुरु निवडीसाठी निवड समिती स्थापन करण्यात आली होती. निवड समितीने पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले होते.
आलेल्या अर्जांतून छाननी होऊन निवड समितीने कुलगुरु पदासाठी मुलाखती घेतल्या. त्यातून अंतिम निवडीसाठी पाच जणांची यादी तयार करण्यात आली. या पाचपैकी एका उमेदवाराला कुलगुरुपदाची संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु असे न होता कुलगुरुपदासाठी पाच वर्षे संचालकाचा अनुभव या निकषात राज्यातील एकही उमेदवार बसत नाही. तसेच ज्यांची पाच वर्षे पूर्ण आहेत, अशा पात्र उमेदवारांना पाच वर्षे वयोमर्यादेमुळे कुलगुरुपदाची संधी मिळत नव्हती. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी लायक उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे, असा अहवाल निवड समितीने शासनाला दिल्यामुळे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा पदभार परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेंकटेश्वरलू यांच्याकडे सोपवण्यात आला. गेली ९ महिने दापोली कृषी विद्यापीठाचा कारभार परभणी कृषी विद्यापीठातून सुरु होता.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रिया रद्द झाल्यावर कुलगुरु पदासाठी राज्यातील एकही कृषी शास्त्रज्ञ पात्र नसेल तर निकष बदलावे यासाठी हालचाली सुरु झाल्या. दापोली कृषी विद्यापीठापाठोपाठ राहुरी कृषी विद्यापीठ, अकोला कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या नेमणुका आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठात पात्र उमेदवार नसेल तर अमराठी भाषिक कुलगुरु बाहेरच्या राज्यातून आल्यास कृषी क्षेत्राचे नुकसान होऊ शकते. कुलगुरु पदाचे निकष काय असावेत, यासाठी कृषी विद्यापीठातून हरकती मागवण्यात आल्या होत्या. कृषी विद्यापीठाच्या सूचनांचे पालन करुन सुवर्णमध्य काढत शासनाने नवीन निकष लावल्यामुळे कृषी विद्यापीठ भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘लोकमत’ने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या विषयावर वृत्ताबरोबरच संपादकीयही लिहून या विषयाला वाचा फोडली होती. अखेरीस राज्य शासनाने या वृत्ताची गंभीर दखल घेतली असून, कुलगुरूंबाबतचे निकषच बदलल्याने आता कृषी विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळणार आहे.
कृषी विद्यापीठ कुलगुरुंबाबत लोकमतने केला होता पाठपुरावा.
कुलगुरुपदाचे निकष बदलण्याची सर्वप्रथम दिली होती ‘लोकमत’ने बातमी.
दापोली कृषी विद्यापीठातील डॉ. संजय भावे, डॉ. उत्तमकुमार महाडकर, डॉ. एस. एस. बुरटे या विभागप्रमुखांनाही संधी.