आता 'हॉटेल' च्या वीजवापरावर महावितरण ठेवणार 'वॉच'
By admin | Published: November 17, 2016 06:11 PM2016-11-17T18:11:45+5:302016-11-17T18:11:45+5:30
पश्चिम महाराष्ट्राच्या विविध शहरातील मोठ्या हॉटेलांच्या संशयास्पद वीजवापरावर 'वॉच' ठेऊन वीजवापराच्या मुख्य कालावधीतच वीजयंत्रणेची विशेष पथकांद्वारे तपासणीची धडक
आप्पासाहेब पाटील
सोलापूर, दि. 17 - पश्चिम महाराष्ट्राच्या विविध शहरातील मोठ्या हॉटेलांच्या संशयास्पद वीजवापरावर 'वॉच' ठेऊन वीजवापराच्या मुख्य कालावधीतच वीजयंत्रणेची विशेष पथकांद्वारे तपासणीची धडक कारवाई करण्यात येणार आहे़ याबाबत प्राथमिक स्तरावरील कारवाई प्रादेशिक कार्यालयाने सुरु केली आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक, कृषी वीजग्राहकांच्या वीजचोरीच्या मोहिमा यशस्वीतेनंतर आता राज्यातील हॉटेलमधील वीजवापरावर महावितरण अधिकच लक्ष ठेवणार आहे़ त्यामुळे आता राज्यातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणणार यात शंका नाही़
दरम्यान, पुणे शहरातील काही मोठ्या हॉटेलांमधील वीजयंत्रणेची रविवारी, पाच तासांच्या कालावधीत अचानक तपासणी करण्यात आली. यात ५ हॉटेलमधील वीजवापरात अनियमित दिसून आली आहे़ त्याच धर्तीवर महावितरणच्या विशेष पथकाकडून धाडसत्र सुरू करण्यात येणार आहे़
महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाने सुमारे ३० किलोवॅटपेक्षा अधिक वीजभाराची वीजजोडणी असलेल्या मोठ्या हॉटेलांमधील गेल्या काही महिन्यांच्या वीजवापराचे विश्लेषण सुरु केले आहे. एकाच दिवशी तसेच वीजवापराच्या मुख्य कालावधीतच या हॉटेलांमधील वीजयंत्रणेची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयाकडून विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक पथकात दक्षता व सुरक्षा आणि चाचणी विभागाच्या ९ अधिकांऱ्याचा समावेश आहे. पुणे शहरातील विविध ठिकाणच्या काही हॉटेलांमध्ये वीजवापर संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
त्यानुसार या पथकांनी हॉटेलांमधील वीजमीटर व यंत्रणेची तपासणी केली. त्यात पाच हॉटेलमधील वीजवापर अनियमित असल्याचे दिसून आले. एका हॉटेलमधील वीजयंत्रणेत फेरफार झाल्याचे आढळून आले आहे. या पाचही हॉटेलांमधील अनियमिततेबाबत आणखी तांत्रिक तपासणीचे काम सुरु आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांत अशाच मोहिमा राबविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत मोठ्या हॉटेलांमधील वीजवापराचे महावितरणकडून विश्लेषण करण्यात येत आहे. संशयास्पद वीजवापर दिसून येत असलेल्या हॉटेलांच्या वीजयंत्रणेची अचानक तपासणीही करण्यात येत आहे. यात वीजचोरी किंवा अनधिकृत वीजवापर आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजचोरीचे प्रकार टाळावेत व वीजयंत्रणेच्या वायरिंगमध्ये किंवा यंत्रणेत कोणत्याही प्रकारचे फेरफार करू नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.