आता हवामानाचा अंदाज आणखी अचूक वर्तविता येणार
By admin | Published: March 23, 2017 02:34 AM2017-03-23T02:34:06+5:302017-03-23T02:34:06+5:30
हवामानाचे अचूक भाकीत करण्यासाठी पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामान संस्थेने ‘शॉर्ट रेंज इन्सेन्सेबल प्रेडिक्शन सिस्टिम’ हे नवे मॉडेल तयार
विवेक भुसे / पुणे
हवामानाचे अचूक भाकीत करण्यासाठी पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामान संस्थेने ‘शॉर्ट रेंज इन्सेन्सेबल प्रेडिक्शन सिस्टिम’ हे नवे मॉडेल तयार केले आहे. त्याद्वारे २५ चौ.किमी परिसरातील पुढील दहा दिवसांच्या हवामानाचा अचूक अंदाज मिळणार आहे़ महिनाअखेरपर्यंत हे मॉडेल हवामान विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे़
डॉ़ पी़ मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली एक चमू दीड वर्षापासून या मॉडेलवर काम करीत आहे़ शॉर्ट रेंज इन्सेन्सेबल प्रेडिक्शन सिस्टिममध्ये २५ चौरस किलोमीटर परिक्षेत्रातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो़ हे मॉडेल मूळचे अमेरिकन असून, त्याचा जगभरात वापर केला जातो़ वेगवेगळ्या ठिकाणांहून तसेच उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या हवामानाची माहिती एकत्रित करून त्याआधारे हे मॉडेल तयार करण्यात यश आले आहे़
नुकत्याच मराठवाड्यात झालेल्या अवकाळीचा अचूक अंदाज हवामान खात्याला व्यक्त करता आला नव्हता. मात्र त्याचवेळी प्रयोगावस्थेत असलेल्या भारतीय उष्णदेशीय हवामान संस्थेने तयार केलेल्या फोरकास्ट सिस्टिमने याचा अचूक अंदाज व्यक्त केला होता.